
सामना ऑनलाईन । जयपूर
वाढत्या महागाईची मी चिंता करत नाही. मी मंत्री असल्याने मला पेट्रोल फुकटात मिळते. माझ्याकडे मंत्रीपद नसेल तेव्हा मला याबाबात विचार करावा लागेल आणि वाढत्या महागाईची समस्या मलाही जाणवेल असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. जयपूरमध्ये चाय पे चर्चा कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांनी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांबाबत त्यांना विचारले असता त्यांनी हे वादग्रस्त विधान केले. या विधानाने त्यांनी सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
पेट्रोल डिझलेच्या किंमती कमी होण्याची गरज आहे. केंद्र सरकार या किंमती कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, राज्य सरकारनेही स्वतःची जाबाबदारी ओळखून कर कमी करावा असे सांगत त्यांनी राज्याकडे दरवाढीचा चेंडू टोलवला. मात्र, मी मंत्री असल्याने मला वाढत्या महागाईची चिंता नसल्याचे विधान त्यांनी केले. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सामान्य जनता होरपळून निघत असताना केंद्रीय मंत्र्यांच्या या विधानामुळे जनतेत संताप व्यक्त होत आहे. वाढत्या महागाईची झळ मंत्र्यांना बसत नसल्याने अशी असंवेदनशील विधाने ते करत असल्याची जनतेची भावना आहे.
























































