
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आपल्या शीघ्र कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. आता ते नव्याने इतिहास संशोधकही झाले आहेत. अयोध्येत ना राम मंदिर होते, ना बाबरी मशीद, तेथे तर बौद्ध मंदिर होते! असा अजब दावा त्यांनी केला आहे. वादग्रस्त जागेवर खोदकाम केल्यास तेथे बौद्धमूर्तीच आढळतील, असेही त्यांनी छातीठोकपणे सांगितले.
राजस्थानात जयपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी अयोध्येत कधीही राम मंदिर नव्हते, असे तर्कट मांडले. तेथे मंदिर नव्हते, मशीदही नव्हती. अयोध्येत बौद्धमंदिर होते आणि आजही तेथे उत्खनन केल्यास बौद्धमूर्तीच सापडतील, असा दावाही त्यांनी केला. अयोध्येतील बौद्धमंदिर हिंदूंनी उद्ध्वस्त केले, असा आरोपही त्यांनी केला. मुसलमानांनी मंदिर तोडून मशीद बांधली. आता तेथील जमीन हिंदू व मुस्लिमांमध्ये वाटून देण्यात यावी, असा सल्लाही रामदास आठवले यांनी दिला.

























































