भाषावृद्धीसाठी इतर भाषांतील योग्य शब्द स्वीकारले पाहिजेत – भटकळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपण भाषेबद्दल व्यापक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. इतर भाषांमधील योग्य असे शब्द आपण स्वीकारले पाहिजेत. यामुळे भाषावृद्धीला मदतच होईल, असे मत ज्येष्ठ प्रकाशक, लेखक डॉ. रामदास भटकळ यांनी व्यक्त केले.

कविवर्य कुसुमाग्रजनगरीतील मुख्य मंडपात शनिवारी सकाळी डॉ. रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत प्रकाशक दिलीप माजगावकर आणि चंद्रकांत पाटील यांनी घेतली. वयाच्या 17व्या वर्षी घरच्या प्रकाशन व्यवसायात भटकळ यांनी पदार्पण करीत गेल्या 70 वर्षात मराठी साहित्यसंपदेच्या विश्वात अमूल्य असे योगदान दिले. या समृद्ध प्रवासाबद्दल माजगावकर आणि पाटील यांनी प्रश्न विचारले असता भटकळ यांनी मनमोकळी उत्तरे दिली.

माजगावकर यांनी पॉप्युलर प्रकाशनाची सुरुवात ते घोडदौड याविषयी प्रश्न विचारला तेव्हा भटकळ म्हणाले की, 1924 ला वडिलांनी पॉप्युलर प्रकाशन सुरू केले. तेव्हा पन्नासच्या आसपास ग्रंथप्रेमी कर्मचारी सोबतीला होते. 1952 ला मराठी ग्रंथांचे माहेरघर असलेले बॉम्बे बुक डेपो घेतले आणि आमच्या प्रकाशन संस्थेचे मराठी साहित्य विश्वात पाऊल पडले. कॉलेजमध्ये असताना प्रथम संगीत मग नाटक आणि नंतर लेखनाकडे वळलो. मौज आणि वृत्तपत्रांमध्ये नाटकांचे परीक्षणही लिहिले. इंग्लंडला शिक्षण घेत असताना चार महिन्यांत 45 नाटके बघितली, असे त्यांनी सांगितले.