कुठलीही बेशिस्त खपवून घेणार नाही, रामदास कदम यांचा काँग्रेसला इशारा

41

सामना प्रतिनिधी । नांदेड

आपल्या इच्छेनुसार व सोयीनुसार नियोजन मंडळाची बैठक न झाल्याने व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या दिवशी बैठक होऊ न शकल्याने सोमवारी काँग्रेस सदस्यांनी नियोजन मंडळाच्या बैठकीत गोंधळ घातला. यानंतर कुठलीही बेशिस्त आपण खपवून घेणार नाही, आपण कोणाचाही अपमान केला नसून आजही आपलीच सत्ता असल्यासारखे वागणाऱ्या काँग्रेसला लगाम घालण्याचा आपण प्रयत्न केल्याचे मत पालकमंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.

बेशिस्त काँग्रेस सदस्यांना पालकमंत्र्यांनी झापले

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक एक तर 28 तारखेला घ्या किंवा 3 नोंव्हेंबरला घ्या, अशी सूचना केली होती. मात्र उशिर होत असल्याने नियोजित वेळीच 29 ऑक्टोबरला ही बैठक घेण्याचा आपण निर्णय घेतला. बैठकीच्या सुरुवातीलाच काल वाढदिवस साजरा केलेल्या माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा ठराव मांडण्याचा प्रयत्न सभागृहात करण्यात आला तो आपण हाणून पाडला, त्यामुळे सभागृहात गोंधळ घालून विनाकारण बदनामी करण्याचा काँग्रेसवाल्यांनी प्रयत्न केला. मात्र अशा गोंधळाला व दबावतंत्राला आपण भीक घालणार नाही, कुठल्याही पक्षाच्या नेत्याचा असा ठराव घेऊन सभागृहाचा पायंडा बदलण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला, मात्र अत्यंत कणखरपणे आपण तो हाणून पाडल्याने चवताळलेल्या काँग्रेस मंडळींनी सभागृहात गोंधळ केला. बेशिस्त आपण कधीही खपवून घेतली नाही, एक कडवा शिवसैनिक म्हणून मी कुणाच्या दबावाला बळी पडणार नाही व कुणाचा दबावही सहन करणार नाही, असा खणखणीत इशारा पालकमंत्री कदम यांनी दिला. सभागृहात रुपाली अशोक मामीडवार या महिला सदस्याने आमच्या भागातील काही गावे विकास कामे न झाल्यास तेलंगणात जातील, अशी धमकी सभागृहात दिली. मात्र अशा धमक्याला भीक न घालता संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कर्ता असल्याने त्यांची ही मागणी अमान्य केली. यावेळी माझ्या तोंडून असभ्य भाषा बोलल्याचा गलबला केला, मात्र मी कधीही कोणत्याही महिलेला असभ्य भाषा केली नाही, कुणीही यायचे, विकास कामांच्या संदर्भात तेलंगणात जाण्याची भाषा करायची व धमक्या द्यायच्या हे महाराष्ट्राला शोभणारे नाही असेही आपण सुनावल्याचे त्यांनी सांगितले.

अजूनही आपण सत्तेत असल्याचा माज काँग्रेसला असून, आपल्याशिवाय कुठलेही उद्घाटन होवू नये ही त्यांची भूमिका देखील आपण हाणून पाडत आज देगावचाळ येथील पुलाचे भूमिपुजन तसेच सिडको भागातील स्मशानभूमीचे भूमिपुजन आपण केल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. दबावतंत्राचा वापर करणे आणि पालकमंत्र्यांना वाटेल तसे झुकविणे हि बाबच संतापजनक असल्याने यापुढे देखील अशाच पद्धतीने उत्तर दिले जाईल, अशी ठोक भूमिका त्यांनी मांडली. बैठक 28 ला घ्या किंवा 3 नोव्हेंबरला घ्या, असा दबाव माजी मुख्यमंत्र्यांनी आपल्यावर टाकल्याचा आरोप करुन मी कुणाच्याही धमकीला, दबावाला बळी पडणारा नाही, असा इशाराही पालकमंत्री रामदास कदम यांनी दिला. या पत्रकार परिषदेला आमदार हेमंत पाटील, आमदार सुभाष साबणे, आमदार तुषार राठोड, जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, उमेश मुंढे, आनंदा बोंढारकर, महानगरप्रमुख अशोक उमरेकर, शहरप्रमुख सचिन किसवे, तुलजेश यादव आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या