
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशातल्या वाढत्या महागाईच्या भडक्यावर योग गुरू बाबा रामदेव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा दिला आहे. सरकारने महागाईची आग विझवावी अन्यथा निवडणुकांमध्ये ती महाग पडेल, अशी सूचनावजा इशारा बाबा रामदेव यांनी पंतप्रधानांना दिला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना बाबा रामदेव यांनी हा इशारा दिला आहे.
जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, पतंजलीच्या अनेक उत्पादनांना लाँच केल्यानंतर एका खासगी वृत्तवाहिनीने त्यांना एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. यावेळी देशातल्या अनेक मुद्द्यांवर बाबा रामदेव यांनी आपली मतं मांडली. यात महागाईच्या मुद्द्यावर बाबा रामदेव म्हणाले की, आपण इंधनदर घटवू शकत नाही, कारण ते सरकारचं अधिकारक्षेत्र आहे. यानंतर बाबा रामदेव यांना या मुद्द्यावरून मोदी सरकारला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा ते म्हणाले की, इंधनदरावरचा कर हटवल्यास आजही पेट्रोल ४० रुपये लीटर दराने मिळू शकतं. मोदीजी मुके किंवा बहिरे नाहीत, ते नक्कीच जनतेचा रोष ऐकत असतील. २०१९चा महासंग्राम जवळ आलाय, त्यामुळे त्यांना ही महागाईची आग विझवावीच लागेल. अन्यथा निवडणुकीत त्यांना ती महाग पडेल, असं बाबा रामदेव यावेळी म्हणाले.
— Saamana (@Saamanaonline) September 13, 2018
मोदी सरकारच्या काळात किती प्रमाणात रोजगार निर्मिती झाली, या प्रश्नाचं उत्तर देताना रामदेव बाबांनी हे भाजप प्रवक्त्यांना विचारावं लागेल, पण पंतजलीने २० हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला असल्याचा दावा केला आणि येत्या सहा महिन्यांत दीड लाख लोकांना रोजगाराचं आश्वासनही दिलं.
summary- ramdev baba warns modi over inflation




























































