मुंबईचा दुसर्‍या डावात सुरेख मारा, महाराष्ट्राकडे 191 धावांची आघाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे 

महाराष्ट्राने मुंबईला 80.5 षटकांत 273 धावसंख्येवरून रोखून रणजी चषक क्रिकेट स्पर्धेतील एलिट ‘अ’ गटाच्या लढतीत पहिल्या डावात 79 धावांची आघाडी घेतली. अनिर्णीतावस्थेकडे झुकलेल्या या लढतीत यजमान महाराष्ट्राची दुसर्‍या डावात उर्वरित 52 षटकांच्या खेळात 5 बाद 112 अशी घसरण झाली. मात्र तरीही महाराष्ट्राकडे 191 धावांची आघाडी असून त्यांचे 5 फलंदाज शिल्लक आहेत. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार राहुल त्रिपाठी 13, तर सत्यजित बछाव 3 धावांवर खेळत होते.

त्याआधी शुक्रवारी 70 धावांवर नाबाद परतलेल्या सिद्धेश लाडला शनिवारी शतकाने हुलकावणी दिली. समद फल्लाहने त्याला 93 धावांवर बाद केले. लाडने 180 चेंडूंत 13 चौकारांसह एक षटकार ठोकला.

महाराष्ट्राची दुसर्‍या डावाची सुरुवातही समाधानकारक झाली होती. स्वप्नील गुगळे (37) व चिराग खुराणा (38) यांनी 58 धावांची संयमी सलामी दिली. मात्र शिवम मल्होत्राच्या गोलंदाजीवर गुगळे यष्टीमागे अदित्य तरेकरवी झेलबाद झाल्यानंतर  आलेल्या जय पांडे (9) व नौशाद शेख (4) या फलंदाजांना शिवम दुबेने बाद केले. मग रॉयस्टन डायसने रोहित मोटवाणीला यष्टीमागे झेलबाद करून मुंबईला पाचवे यश मिळवून दिले.