
>> रंगनाथ कोकणे
भारतात एकीकडे कोटय़वधी नागरिक स्वच्छ पाण्यासाठी संघर्ष करत आहेत तर दुसरीकडे देशातील श्रीमंत वर्ग पाण्याकडे एक मूलभूत गरज म्हणून नाही तर आलिशान अनुभव म्हणून पाहत आहेत. बाटलीबंद पाणी हे स्वच्छ पाण्याची हमी देत असताना दुसरीकडे ते स्टेटस सिम्बॉल आणि जीवनशैलीचा भाग होताना दिसत आहे. देशातील मोठय़ा महानगरात इटली, फ्रान्स आणि अन्य युरोपिय देशांकडून आयात केलेले महागडय़ा पाण्याची मागणी वेगाने वाढत असून देशात एक नवीन प्रीमियम वॉटर कल्चर विकसित होत आहे.
दिल्ली, मुंबई, बंगळुरू, गुरुग्राम यासारख्या निवडक शहरांत आलिशान फुड स्टोअर आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये विशेष चवीचे पाणी प्राशन करण्याचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमात सहभागी होणारी मंडळी जगभरातील नामांकित ब्रँडचे पाणी वाईन, कॉफीप्रमाणे तपासत आहेत. या कार्यक्रमातून पाण्यातील मिनरल कंटेट, कार्बोनेशन, खारटपणा आणि चवीबद्दल गांभीर्याने चर्चा होते. सध्या ही बाब भारतातील उच्चभ्रू वर्गापुरतीच मर्यादित आहे. परंतु आगामी काळात त्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता अधिक आहे.
पाण्याची चव घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करणाऱयांपैकी एक अवंती मेहता यांनी स्वतःला भारताची सर्वात तरुण ‘वॉटर सोमेलिएर’ असल्याचे म्हटले आहे. सेमिलिएर हा शब्द वाईन तज्ञांसाठी वापरला जातो आणि आता पाणी क्षेत्रातही उपयोगात आणला जात आहे. अवंतीच्या मते, वेगवेगळ्या भौगोलिक स्थितीतून उपसलेल्या पाण्याची चव आणि पोषणमूल्य वेगळे असते. ‘रॉयटर्स’च्या एका अहवालानुसार या आयोजनात फ्रान्सच्या पर्वतरांगातील पाणी सादर करणारे एबिया, दक्षिण फ्रान्सची पेरिये, इटलीची सॅन पेलग्रिनो, भारतातील अरावली पर्वताचे पाणी आणणारे आवा मिनरल वॉटर यासारख्या ब्रँडचा समावेश होतो. अवंतीच्या मते, प्रत्येक ठिकाणच्या पाण्याची चव वेगळी असते, हे लोकांना कळून चुकले आहे. काही ठिकाणी कॅल्शियम अधिक असते तर काहीत मॅग्नेशियम तर काही ठिकाणी नैसर्गिक कार्बोनेशन. योग्य प्रकारचे पाणी निवडणे हे शरीरासाठी फायदेशीर राहू शकते. विशेष म्हणजे अवंती यांचे कुटुंबीय आवा मिनरल नावाची कंपनी चालवते आणि ते भारतातील प्रीमियम वॉटर ब्रँड्समध्ये स्वतःचे स्थान निर्माण करत आहे.
पाणी आता विशेषाधिकार
1.4 अब्ज लोकसंख्येच्या आपल्या देशात स्वच्छ पाणी हा कळीचा मुद्दा ठरत आहे. संशोधकांच्या मते, देशातील सुमारे 70 टक्के भूजल कोणत्या ना कोणत्या रूपाने दूषित झाले आहे. अनेक शहर आणि वाडय़ावर नळातून येणारे पाणी पिण्याजोगे राहिलेले नाही. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात इंदूरमध्ये गलिच्छ पाणी पिल्याने सोळा जणांचा मृत्यू झाल्याची बातमी खळबळ उडविणारी ठरली. अशावेळी बाटलीबंद पाणी भारतातील काही लोकांसाठी अत्यावश्यक बाब बनली आहे. किराणा दुकानात एक लिटरची पाण्याची बाटली वीस रुपयांना मिळते. हे पाणी पेप्सी, कोका कोला, बिस्लरी तयार करतात. पिण्याच्या पाण्याच्या उद्योगाची उलाढाल तब्बल पाच अब्ज डॉलर आहे. यात दरवर्षी 24 टक्क्यांनी वाढ होत असून त्यात भारत या क्षेत्रात वेगाने विकसित होणारी बाजारपेठ म्हणून समोर येत आहे.
जागतिक पातळीवर बाटलीबंद पाण्याची उलाढाल तीस अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. चीन आणि अमेरिकेसारख्या देशांत होणारी मागणी ही प्रामुख्याने जीवनशैली अणि सुविधेच्या रूपातून होताना दिसते. तेथे दरवर्षी चार ते पाच टक्के वाढ नोंदली जात आहे. या तुलनेत भारतात प्रीमियम पाण्याची मागणी अनेक पटीने वाढताना दिसून येते. बाजारातील रिसर्च कंपनी युरोमॉनिटरच्या आकडेवारीनुसार, भारतात प्रीमियम वॉटरची मागणी 2021 मध्ये केवळ एक टक्का असताना 2025 पर्यंत ती वाढत आठ टक्क्यांवर पोचली आहे. ‘युरोमॉनिटर‘चे अधिकारी अमूल्य पंडित यांच्या मते, महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱया पाण्यावरचा लोकांचा विश्वास उडत चालला आहे. केवळ बाटलीबंद पाणीच आरोग्यासाठी उपायकारक असल्याचे लोकांच्या मनात भावना निर्माण झाली आहे. पंडित यांच्या मते, पाणी महाग असले तरी त्याची मागणी पुढेही वाढणार आहे. जी मंडळी नियमितपणे बाटलीबंद पाणी खरेदी करू शकत नाहीत, ते वॉटर प्युरिफायरची मदत घेतात. मात्र प्युरिफायरमध्ये पाणी स्वच्छ होताना त्यातील नैसर्गिक तत्त्व निघून जाते, असे निरीक्षण आहे.
स्पार्कलिंग आणि स्प्रिंग वॉटरची मागणी
भारतात आता केवळ स्टिल वॉटरच नाही तर स्पार्कलिंग आणि स्प्रिंग वॉटरची मागणीदेखील वाढत आहे. हा ट्रेंड पूर्वी युरोप आणि अमेरिकेपर्यंतच मर्यादित होता, परंतु आता भारतीय ग्राहकांकडूनही त्याला पसंती दिली जात आहे. टाटा समूहाने अलीकडेच स्पार्कलिंग वॉटरचा प्लँट सुरू केला आहे आणि कंपनी भविष्यात स्प्रिंग वॉटरच्या उत्पादनातदेखील येण्याची तयारी करत आहे.
टाटा अधिकाऱयांच्या मते, त्यांच्या पाण्याच्या उद्योगाची उलाढाल दरवर्षी सुमारे 30 टक्के वाढ नोंदवू शकते. भारतात प्रीमियम वॉटर ब्रँड आवा याची विक्री ही मागील वर्षी विक्रमी पातळीवर नऊ दशलक्ष डॉलरपर्यंत पोचली होती. कंपनीच्या मते, शहरातील मध्यम वर्ग आणि श्रीमंत गटातील ग्राहकांत आरोग्य आणि चवीवरून वाढलेली जागरुकता पाहता प्रीमियम वॉटरची मागणी वाढत आहे. त्याचवेळी परकी ब्रँडसदेखील भारताकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहत आहेत. अर्थात या संपूर्ण ट्रेंडमागे एक कटुसत्यही दडलेले आहे. त्यात देशात कोटय़वधी नागरिक आजही सुरक्षित पाण्यापासून वंचित आहेत. हे चित्र सामाजिक असमानता दाखविणारे आहे. तज्ञांच्या मते, पाण्यासारख्या मूलभूत गरजा केवळ बाजाराच्या भरवशावर सोडणे कितपत योग्य आहे? अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक पाणीपुरवठा प्रणाली सक्षम करण्यावर भर देण्याचा मुद्दा मांडला आहे. पाण्याची गळती थांबवून स्वच्छ आणि आरोग्यपुरक पाणी देणे आवश्यक असताना लोकांना महागडय़ा पर्यायाची निवड करण्यास भाग पाडू नये, असेही मत नोंदविले.
पाण्याची चव आखण्यासंदर्भात आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या मंडळींनी काही अनुभव शेअर केले. ते म्हणतात, पाण्याची चव वेगळी असली तरी त्याची किंमत आटोक्याबाहेरची आहे. एका ग्राहकाच्या मते, पाण्याची चव छान वाटली, मात्र पाणीदेखील एवढे महाग असू शकते, याची कल्पना करवत नाही. याउलट श्रीमंत वर्गात त्याचे प्रस्थ वाढताना दिसून येते. एकुणातच भारतात बाटलीबंद पाण्याची कहाणी आता केवळ तहान भागविण्यापुरती मर्यादित राहिलेले नाही, हे स्पष्ट आहे. या पाण्यावर आता आरोग्य, चव, सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक असमानतेचे थर जमा झालेले आहेत. एकीकडे चविष्ट पाणी पिण्याचा बाजार बहरत असताना दुसरीकडे स्वच्छ पाण्यासाठी सर्वसामान्य माणसांची तडफड सुरू आहे. आगामी काळात हे चित्र भारतात संतुलित कसे केले जाईल हे महत्त्वाचे राहील.
बाटलीबंद पाण्याचा बाजार
बाटलीबंद पाण्याचा बाजार भारतात आलिशान प्रॉडक्टचे रूप धारण करत आहे. चांगल्या गुणवत्तेच्या पाण्याचा बाजार सुमारे 400 दशलक्ष डॉलरपर्यंत पोचू शकतो. तज्ञांच्या मते, भारताची लोकसंख्या आणि वाढते शहरीकरण पाहता हा बाजार आगामी काळात आणखी वाढू शकतो. प्रामुख्याने उच्च उत्पन्न गटातील लोक आता पाण्याकडे आरोग्याबरोबरच सामाजिक प्रतिष्ठेला जोडत आहेत. भारतात सर्वात महाग आणि विशेष मिनरल असलेल्या बाटलीबंद पाण्याची किंमत एका लिटरसाठीं 80 ते शंभर रुपये आहे. त्याचवेळी परदेशातून आयात बाटलीची किंमत अडीचशे ते तीनशे रुपयांपर्यंत आहे. या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतानाही त्याची मागणी वाढत आहे. पंचतारांकित हॉटेल्समध्ये भोजनाबरोबरच पाण्याचीदेखील विचारणा केली जात आहे, हे विशेष.
(लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत.)





























































