महान प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे दत्तकपुत्र, जगदविख्यात शारदाश्रम विद्यामंदिर आणि शिवाजी पार्क जिमखान्याचे क्रिकेट प्रशिक्षक असलेले रेल्वेचे माजी रणजीपटू नरेश चुरी यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.
पाच कन्या असलेल्या आचरेकर सरांनी चुरी यांना वयाच्या अवघ्या 13 वर्षी दत्तक घेतले. त्यामुळे दत्तकपुत्र चुरी यांच्यावर बालपणापासूनच क्रिकेटचे संस्कार झाले. एवढेच नव्हे तर 1982-83 साली त्यांनी रेल्वेकडून रणजी पदार्पणही केले. डावखुऱ्या चुरी यांनी रेल्वेसाठी 32.63 च्या सरासरीने 1501 धावाही केल्या. यात 2 शतके आणि 7 अर्धशतकांचाही समावेश आहे. 1987-88 साली कर्नाटकविरुद्धच्या रणजीच्या अंतिम फेरीत त्यांनी 112 धावांची खेळी साकारली होती. ते काहीकाळ ससानियन क्रिकेट क्लब आणि नंतर शिवाजी पार्क यंगस्टर्स आणि आरसीएफकडून स्थानिक क्रिकेट खेळले होते.
चुरी यांनी क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द गाजवल्यानंतर 1999 सालापासून ते शारदाश्रम विद्यामंदिराच्या क्रिकेट प्रशिक्षकाची भूमिकाही खणखणीत निभावली. त्यांनी काही वर्षे रुपारेल कॉलेजचे क्रिकेट प्रशिक्षकपदही सांभाळले. चुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानी संघात अभिषेक नायरसारखा क्रिकेटपटू दिला. तसेच मुंबई क्रिकेटला साईल कुकरेजा, ओमकार गुरव, सचिन यादव, आनंद सिंग, विक्रांत आवटीसारखे अनेक क्रिकेटपटूही त्यांच्या मार्गदर्शनामुळे लाभले. मुंबईत हजारोंच्या संख्येने क्रिकेटपटू घडवल्यानंतर चुरी हे गेले काही वर्षे सिंधुदुर्गातील मालवण, कणकवली, कुडाळ येथील नवोदित क्रिकेटपटूंना क्रिकेटचे बारकावे शिकवत होते.
‘आचरेकर सर’ सिनेमाचे स्वप्न अधुरेच राहिले
भारतरत्न सचिन तेंडुलकरसह अनेक जागतिक दर्जाचे क्रिकेटपटू ज्यांनी घडवले त्या रमाकांत आचरेकरांवर ‘आचरेकर सर’ नावाच्या सिनेमाची घोषणाही नरेश चुरी यांनी गेल्या वर्षी केली होती. तसेच ‘आचरेकर सर आणि मी’ हे पुस्तकही त्यांनी लिहीत आपल्या आचरेकरांबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला होता. तसेच त्यांनी विविध खेळातील नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी ‘रमाकांत आचरेकर सर क्रीडा न्यास’ या संस्थेची स्थापनासुद्धा केली होती.
आचरेकरांची क्रिकेटवरची निष्ठा, आपल्या शिष्यांना घडवताना घेतलेले कष्ट आणि सचिनला घडवण्यापलीकडचे सर या सर्व गोष्टी सामान्य क्रिकेटप्रेमींपर्यंत पोहोचाव्यात म्हणून चुरी हे आचरेकर सर सिनेमाची निर्मिती करत होते. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी एका ज्येष्ठ आणि दिग्गज दिग्दर्शकावर सोपवली जाणार आहे. मात्र चुरी यांच्या निधनामुळे त्यांचे सिनेमा बनविण्याचे स्वप्नही अधुरेच राहिले आहे. आता चुरींचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांच्या मित्रपरिवारालाच पुढाकार घेऊन सिनेमा निर्मितीची जुळवाजुळव करावी लागणार आहे.