
हिंदुस्थानातील प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी रणजी स्पर्धा या वर्षी होणार नाही. कोरोनामुळे या मोसमातील स्पर्धांना उशिरा सुरुवात झालीय. त्यामुळे बीसीसीआयने काही स्पर्धांना कात्री लावलीय. यामध्ये रणजी ट्रॉफीचाही समावेश आहे. या मोसमात आतापर्यंत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही स्पर्धा पार पडली असून आता आगामी महिन्यांमध्ये विजय हजारे, विनू मंकड (19 वर्षांखालील) आणि महिलांची वन डे स्पर्धा या तीनच स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. 1934-35 साली रणजी ट्रॉफीचा श्रीगणेशा करण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत दरवर्षी ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. पण 87 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच या स्पर्धेला रेड सिग्नल मिळाला आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली व सचिव जय शहा यांचे प्राधान्य रणजी ट्रॉफीला होते. ही स्पर्धा खेळवण्यात आल्यास देशातील स्थानिक क्रिकेटपटूंना चांगले मानधन मिळू शकले असते. पण रणजी स्पर्धेच्या लढती चार दिवसीय असतात. तसेच ही स्पर्धा प्रदीर्घ चालते. त्यामुळे जास्त अवधीमध्ये खेळाडूंना बायोबबलमध्ये ठेवणे कठीण आहे. यामुळे रणजी स्पर्धा न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई, ओडिसाचा हजारे ट्रॉफीला तर आंध्रचा रणजीला सपोर्ट
या मोसमात कोणत्या स्पर्धा खेळवायला हव्यात यासाठी बीसीसीआयकडून संलग्न संघटनांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. मुंबई, ओडिसा या संघटनांकडून विजय हजारे ट्रॉफीला पसंती दाखवण्यात आली. तसेच आंध्रने रणजी ट्रॉफी व्हावी यासाठी आग्रह धरला होता. पण बहुतांशी संघटनांनी विजय हजारे ट्रॉफी आयोजनालाच थम्स अप दाखवला.
खेळाडूंना भरपाई मिळणार
कोरोनामुळे या वर्षी स्पर्धांना कात्री लावण्यात आली आहे. यामुळे मात्र देशातील स्थानिक क्रिकेटपटूंचे नुकसान झाले आहे. बीसीसीआयकडून यावर तोडगा काढण्यात आला आहे. या मोसमात स्पर्धांमध्ये कपात झाली तरी क्रिकेटपटूंना भरपाई देण्यात येईल. अशी भूमिका बीसीसीआयकडून वार्षिक सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आली. त्यामुळे या मोसमात स्पर्धा झाल्या नसल्या तरी क्रिकेटपटूंना बऱयापैकी मानधन मिळेल हे गृहीत धरायला हरकत नाही.




























































