
सौराष्ट्राच्या क्रिकेट संघाने गुजरातवर 92 धावांनी दमदार विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता जेतेपदाच्या लढतीत त्यांच्यासमोर बंगालचे आव्हान उभे ठाकणार आहे. राजकोट येथे 9 मार्चपासून अंतिम फेरीच्या लढतीला सुरुवात होईल.
गुजरातविरुद्धच्या सामन्यात सौराष्ट्राचा कर्णधार आणि डावखुरा मध्यमगती गोलंदाज जयदेव उनाडकट याने इतिहास रचला. उनाडकटने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 7 अशा एकूण 10 विकेटस् घेतल्या. रणजी स्पर्धेमध्ये एकाच मोसमात आता त्याच्या नावावर 65 विकेट्स झाल्या असून या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्सचा विक्रम त्याने केला आहे. उनाडकट याने एकाच लढतीत कर्नाटकच्या डोडा गणेश आणि बिशनसिंग बेदी यांचा विक्रम मोडला आहे.
रणजी स्पर्धेतमध्ये 1988-99 च्या मोसमात कर्नाटकचा गोलंदाज डोडा गणेश याने 62 विकेट्स घेतल्या होत्या. हा विक्रम जयदेव उनाडकट याने 65 विकेट्स घेत मोडला. यासह 67 कसोटी लढतींमध्ये 266 बळी घेणाऱ्या बिशनसिंग बेदी यांचाही विक्रम उनाडकट याने मोडला आहे. बिशनसिंग बेदी यांनी 1974-75 च्या मोसमात 64 बळी घेतले होते. रणजी ट्रॉफीच्या एका मोसमात सर्वाधिक बळींचा विक्रम बिहारच्या आशुतोष अमन याच्या नावावर आहे. त्याने 2018-19 च्या मोसमात 68 विकेट्स घेतल्या होत्या. अंतिम फेरीमध्ये बंगालविरुद्ध 4 विकेट्स घेताच हा विक्रमही उनाडकटच्या नावावर जमा होईल.
गेल्या 8 मोसमात चौथ्यांदा फायनल खेळणार
सौराष्ट्राच्या संघाने गेल्या आठ मोसमात चौथ्यांदा फायनल गाठली आहे. दुसरीकडे बंगालने सेमी फायनलमध्ये कर्नाटकचा 174 धावांनी पराभव करत फायलनलमध्ये प्रवेश केला आहे. या लढतीत पहिल्या डावात नाबाद 149 आणि दुसऱ्या डावात 41 धावांची खेळी केली होती. दोन्ही डावात दमदार खेळी करणाऱ्या अनुस्तुप मजूमदारला ‘सामनावीर’चा पुरस्कार मिळाला.
सौराष्ट्राला गेल्या मोसमात मिळाले होते उपविजेतेपद
गेल्या मोसमात विदर्भाकडून पराभूत झाल्यामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागणाऱ्या सौराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. कसोटीपटू चेतेश्वर पुजारा अंतिम लढतीत सौराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. 9 ते 13 मार्चला राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सौराष्ट्र आणि बंगालमध्ये रणजी ट्रॉफी 2020 चा अंतिम सामना रंगणार आहे.




























































