
जम्मू-कश्मीरचा संघ आता अक्षरशः जीत-ए-जश्नच्या उंबरठय़ावर उभा आहे. रणजीच्या रनमंचावर नवा इतिहास लिहिण्याची वेळ समोर येऊन ठेपली आहे. औकिब नबीच्या भेदक आणि धारदार माऱयाने कर्नाटकचा वरचा फलंदाजीक्रम चिरडून टाकत तिसऱया दिवसअखेर 5 बाद 220 अशी स्थिती केल्यामुळे पाहुण्या संघाने आपल्या पहिल्यावहिल्या रणजी जेतेपदाच्या दिशेने कूच केली आहे. कर्नाटक 364 धावांनी मागे असून एका धावेची पिछाडीही त्यांना जेतेपदापासून दूर करू शकते.
पहिल्या डावात 584 धावांचा डोंगर उभारल्यानंतर कश्मीरने चेंडू हातात घेताच कर्नाटकची कोंडी केली. नबीने 14 षटकांत केवळ 32 धावा देत तीन विकेट टिपले आणि सामन्याचा सूरच पालटवला. सलग नऊ षटके टाकत त्याने प्रतिस्पर्ध्यांच्या छातीत धडकी भरवली. या भेदक माऱयानंतर कर्नाटकचे 11 वर्षांनतर रणजी जिंकण्याचे स्वप्न दूरवर फेकले गेले.
गेल्या तिन्ही सामन्यांत जबरदस्त फॉर्मात असलेल्या के. एल. राहुलला (13) माघारी धाडत नबीने कर्नाटकवर पहिला घाव घातला. सुनील कुमारने देवदत्त पडिक्कलला टिपत दुसरा धक्का दिला. त्यानंतर नबीने दोन चेंडूंवर दोन विकेट घेत कर्नाटकचा कणाच मोडला. करुण नायरला आत येणाऱया चेंडूवर त्रिफळाचीत केले तर पुढच्याच चेंडूवर स्मरण रविचंद्रनला तंबूत पाठवत कर्नाटकची 4 बाद 57 अशी दुर्दशा केली. एका धावेत 3 फॉर्मात असलेले फलंदाज बाद होताच मैदानावर कश्मीरचा जल्लोष सुरू झाला. आता त्यांच्यासाठी रणजी करंडकाचे चुंबन फार दूर नाही. उर्वरित दोन दिवसांत कर्नाटक 356 धावांची पिछाडी भरून काढणे कठीण आहे. त्यामुळे जम्मू-कश्मीरचे ‘मिशन रणजी’ पूर्ण होणार हे नक्की झालेय.





























































