
सर्वाधिक रणजी चॅम्पियन ठरलेल्या बलाढय़ मुंबईच्या क्रिकेट संघाला मागील दोन लढतींत घरच्या मैदानावर लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या दारुण पराभवांनंतर चोहोबाजूंनी या संघावर टीका होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर दैनिक ‘सामना’ने माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी ते म्हणाले, घरच्या मैदानावर सातत्याने हरणे वाईटच आहे. आता याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मुंबईच्या संघात थोडे बदल करायलाच हवेत. काही खेळाडूंनी विश्रांती द्यायला हवी.
बेंच स्ट्रेंथने चमकायला हवे
श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, शिवम दुबे, रोहीत शर्मा हे खेळाडू संघात नसल्यामुळे मुंबईवर पराभवाची आपत्ती ओढवली असा सूरही यावेळी उमटू लागला. पण यावर दिलीप वेंगसरकर म्हणाले, मुंबईने देशालाच नव्हे तर जगाला अव्वल दर्जाचे फलंदाज दिलेत. मुंबईचे खेळाडू नेहमीच देशासाठी खेळतात. पण त्या कालावधीतही मुंबईने रणजी करंडक पटकावलाय. त्यामुळे काही स्टार खेळाडू देशासाठी खेळत असले तर मुंबईच्या कामगिरीत घसरण होण्याची गरज नाहीए. बेंच स्ट्रेंथने चमकदार कामगिरी करायला हवी. आम्हाला संधी मिळत नाही असे बोलणे योग्य ठरणार नाही, असेही ते पुढे स्पष्ट म्हणाले.
पृथ्वी खेळला असता तर…
पृथ्वी शॉने दुसऱया डावात फलंदाजी केली नाही. दुखापतीमुळे त्याला बंगळुरूला पाठवण्यात आले. याबाबतचा निर्णय कोणी घेतला माहीत नाही. पण तो खेळला असता तर मुंबईकडे विजयाची संधी असती. कारण धावांचा पाठलाग करताना कर्नाटकचे पाच फलंदाज बाद झाले होते. आणखी 50-60 धावा झाल्या असत्या, तर निकाल वेगळा लागू शकला असता, असे दिलीप वेंगसरकर यांना वाटते.




























































