रणजीत हत्याकांडप्रकरणी बाबा राम रहीमसह पाचजण दोषी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने रणजीत हत्याकांडप्रकरणी बाबा गुरमीत राम रहीम सिंहसह पाच आरोपींना दोषी ठरवले आहे. सीबीआय विशेष न्यायालय या प्रकरणी 12 ऑक्टोबरला त्यांना शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे. सुनावणीदरम्यान राम रहीमसह एका आरोपीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. तर इतर तीन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते.

डेरा सच्चा सौदाच्या प्रंबधन समितीचे सदस्य रणजीत सिंह यांची 10 जुलै 2002 मध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात खटला सुरू होता. घटनेनंतर तब्बल 19 वर्षांनी न्यायालयाने डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमसह पाच आरोपींना दोषी ठरवले आहे.

या प्रकरणी 12 ऑगस्टला बचाव पक्षाने बाजू मांडली होती. न्यायालयाकडून या प्रकरणी 26 ऑगस्टला निकाल अपेक्षित होता. सीबीआयचे विशेष न्यायाधीश डॉ. सुशील कुमार गर्ग यांच्या न्यायालयात अडीच तास झालेल्या सुनावणीत बाबा राम रहीमसह पाच आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. रणजीत सिंह यांचा मुलगा जगसीर सिंह याने या प्रकरणी तक्रार दाखल केली होती.

सीबीआयने 3 डिसेंबर 2003 मध्ये एफआयआर दाखल केली. आता 19 वर्षांनी बाबा राम रहीमसह पाच आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी न्यायालय 12 ऑक्टोबरला त्यांना शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे. बाबा राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया तुरुंगात आहे. दोन साध्वींच्या लैंगिक शोषण प्रकरणी राम रहीमला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणी राम रहीमला आजन्म तरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.