पशूप्रेमींनी कावळ्यापासून वाचवले गाणाऱ्या रानकस्तुरीचे प्राण

459

नारंगी रंगाचे डोके असलेल्या दुर्मिळ रानकस्तुरी पक्ष्याचे प्राण जोगेश्वरीमधील पशूप्रेमींमुळे वाचले. ऑक्टोबर हीटमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने ही रानकस्तुरी झाडावरून कोसळून खाली पडली. तिच्यावर कावळ्यांनी हल्ला चढवला होता. मार्क ऍलस्टीन या नागरिकामुळे तिचे प्राण वाचले.

मार्क यांना हा दुर्मीळ पक्षी कावळ्यांच्या हल्ल्यात सापडल्याचे दिसताच त्यांनी पळत जाऊन त्याला उचलून कावळ्यांपासून दूर नेले. प्लॅण्ट ऍण्ड ऍनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज) आणि अम्मा केअर फाऊंडेशन या पशूप्रेमी संस्थांच्या कार्यकर्त्यांना त्याची माहिती त्यांनी दिली. कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पशूतज्ञ डॉ. राहुल मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली त्या रानकस्तुरीवर उपचार केले.

या रानकस्तुरीला उडताही येत नसल्याने तिला वन खात्याच्या ताब्यात देण्यात आले असून तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे अशी माहिती अम्मा केअर फाऊंडेशनच्या निशा कुंजू यांनी दिली. आशिया उपखंडात दाट झाडे असलेल्या परिसरात या रानकस्तुरी आढळतात.

आपली प्रतिक्रिया द्या