
>>प्रल्हाद जाधव
सुमारे 1700 चौरस किलोमीटर सर्वदूर पसरलेलं रणथंबोर हे वन्य जीव अभ्यासकांचे तसेच देशविदेशातील लाखो पर्यटकांचे लाडके ठिकाण. पट्टेरी वाघ हे त्यांचे अर्थातच प्रमुख आकर्षण. या जंगलभ्रमंतीत वाघ पाहणं हा खरोखरच अनोखा अनुभव आहे.
राजस्थानातील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाबाबत बऱयाच दिवसांपासून ऐकून होतो. अखेर गेल्या आठवडय़ात तेथे जाण्याचा योग आला. 21 नोव्हेंबरला गुरुवारी सायंकाळी मुंबई – जयपूर सुपरफास्टने निघालो आणि दुसऱया दिवशी सकाळी दहा वाजता सवाई माधोपूरला पोहोचलो. तिथून साधारणपणे एक तासाच्या अंतरावर रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान वसलेले आहे. या साऱया प्रवासात मुंबई जसजशी मागे पडत गेली तसतसे डोक्यातील तणातणावाचे मुद्दे धूसर होत गेले. निसर्गाच्या सान्निध्यात माणूस अंतर्मुख तर होतोच, पण एका अनामिक ऊर्जेने कसा भारावून जातो याचा अनुभव मी अनेकदा घेतला आहे.
सुमारे 1700 चौरस किलोमीटरचा अतिविशाल विस्तार असणारे रणथंबोर हे वन्य जीव अभ्यासकांचे लाडके ठिकाण. देशविदेशातील लाखो पर्यटकांचा जवळपास वर्षभर तिथे राबता असतो. पट्टेरी वाघ हे त्यांचे अर्थातच प्रमुख आकर्षण. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी वाघ बघण्याची जबरदस्त इच्छा असते. त्यातून जवळपास 70 मोठे आणि 30 बछडे अशी आकर्षक व्याघ्रसंख्या असल्याने रणथंबोर ही जागतिक व्याघ्रप्रेमींची जणू पंढरी ठरली आहे.
महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी मी वनपर्यटन केले आहे. जंगलात जायचे ते फक्त वाघ बघण्यासाठी असा सरधोपट विचार मी कधीच केला नाही. उलट जंगलातील अन्य पशुपक्षी, झाड- झाडोरा, नद्यानाले, डोंगरदऱया, तेथील हवा, सूर्योदय-सूर्यास्त हे सगळे माझ्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. या साऱया सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी जंगल भ्रमंती केली पाहिजे या भूमिकेचा मी नेहमी पुरस्कार केला आहे. आताही तीच भूमिका मनाशी बाळगली होती, पण रणथंबोरमधील भ्रमंतीमध्ये प्रत्येक पर्यटकाच्या डोक्यावर बसलेले वाघाचे भूत पाहून आपण किती भाबडे आहोत हाच विचार मनाशी पक्का झाला.
वन विभागाच्या अखत्यारीतील ऐंशी-पंच्याएशी गाडय़ा पर्यटकांना घेऊन दररोज सकाळ-संध्याकाळी विविध भागांत फिरत असत. एखाद्या ठिकाणी वाघाचे पाऊलठसे दिसले किंवा वाघ दिसणार अशी बातमी मिळाली की, तासन्तास त्या भागातील गाडय़ा आणि पर्यटक त्या ठिकाणी वाट पाहत बसतात. ‘आला आला’ असे कुणी जाहीर केले की, वातावरणात चैतन्याची एक लाट उसळते आणि सारेजण डोळ्यांत प्राण आणून तिकडे पाहू लागतात. काही क्षणांनी पुन्हा सारे काही शांत शांत होऊन जाते.
आज वाघ नक्की दिसणार या खात्रीने सकाळी बाहेर पडलेले पर्यटक दुपारी हिरमुसले आणि सायंकाळी जवळचे कुणीतरी गेल्याप्रमाणे चेहरे करून परततात. यातील गंमत सोडून द्या, पण केवळ ‘वाघ’ हा एक शब्द रणथंबोरला वर्षाकाठी पंच्याएWशी कोटी रुपयांचा महसूल मिळवून देतो असे सांगितले तर त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही (त्याआधारे निर्माण होणारा अन्य रोजगार आणि हॉटेलिंग आदी व्यवसायांतील उलाढाल यात धरलेली नाही).
आम्ही अठरा जण सौरभ महाडिक यांच्या ‘हिरवाई’ या संस्थेने आयोजित केलेल्या टूरमध्ये सहभागी झालो होतो. सात दिवसांच्या आमच्या टूरमध्ये आम्ही आठ वेळा रणथंबोरमधील जंगलात विविध ठिकाणी भ्रमंती केली. पहिल्या दिवशी जंगलाच्या अंतर्गत भागातील राजबाग सरोवराच्या काठी ‘ऍरो हेड’ नावाच्या वाघिणीच्या दोन बछडय़ांनी काही लीला दाखवून आम्हाला खूश केले. अर्थात हे दृश्य किमान हजार मीटर अंतरावरून पाहावे लागल्याने दुधाची तहान ताकावर भागविण्यासारखे होते, पण पहिल्याच दिवशी नशीब आमच्या बाजूने असल्याचा संकेत मिळाला होता. शिवाय जाता-येताना चितळ, सांबर, मुंगूस, मोर, भारद्वाज, पिंगळे, गरूड, टकाचोर, गरूड, धनेश इ.च्या दर्शनाचा बोनस मिळाला ते वेगळेच!
दुसऱया दिवशी पहाटे उठून आम्ही (झोन-1मधील) एक अविस्मरणीय भ्रमंती केली. तीन तासांच्या या भ्रमंतीमध्ये सुलताना, नुरी आणि नूर या तीन वाघिणींचे आम्हाला अगदी जवळून म्हणजे पंधरावीस फुटांवरून दर्शन झाले. सुलताना आणि नुरी या दोघी बहिणी (वय किमान तीन वर्षे) त्या वेगवेगळ्या भागांत आम्हाला दिसल्या. जवळपास दहा-दहा मिनिटे त्या आमच्यासमोर होत्या. नूर ही त्यांची आई तिसऱ्या भागात दिसली. तिने एका सांबराची शिकार केली होती आणि आरामात खात बसली होती. तीन तासांत तीन वाघिणींचे दर्शन ही तशी एक अविश्वसनीय गोष्ट. सहजासहजी कोणी विश्वास ठेवणार नाही अशी, पण जंगल भ्रमंतीतील एक अलिखित सूत्र म्हणजे अनपेक्षित गोष्टींची अपेक्षा बाळगणे! (एक्स्पेक्ट द अनएक्स्पेक्टेड) त्याचा प्रत्यय यावेळी आम्हाला आला. पुढे झोन क्रमांक चारमध्ये फिरताना सेमली येथे वाघाचा एक बछडा आरामात पहुडलेला दिसला. हा 19 नंबरच्या वाघिणीचा मुलगा अशी माहिती सौरभने दिली.
रणथंबोरमधील 35 ते 40 वाघ सौरभ त्यांच्या नावानिशी ओळखतो. गेली वीस वर्षे तो रणथंबोरशी जोडलेला आहे. सतरा वर्षांपासून पर्यटकांना तिकडे घेऊन जात आहे. वाघ हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मछली या वाघिणीचे कर्तृत्व आणि तिच्या मृत्यूची कथा सांगताना त्याच्या डोळ्यांत पाणी असते. केवळ एखादा वाघ नव्हे तर त्याच्या पूर्ण घराण्याची माहिती तो देऊ शकतो. ‘वन्य जीव संरक्षण’ या विषयावर त्याने पीएचडी केली आहे. यासंबंधीचे नियोजन करणाऱया केंद्रीय मंडळावर सदस्य म्हणून तो काम करतो. रणथंबोरला जायचे म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तीन महिने आधी बुकिंग करणे आणि इतर खूप कटकटी असतात, पण राज्य आणि देशपातळीवरील अनेक जाणकारांशी, अधिकाऱ्यांशी सौरभने स्नेहबंध जोडले असल्याने आशयात्मक आणि नियोजनात्मक अशा दोन्ही पातळ्यांवर त्याच्या सोबत केलेली टूर सुफळ संपूर्ण होते. मला स्वतःला गेल्या तीस वर्षांच्या भ्रमंतीमध्ये एकदाही वाघ दिसला नव्हता आणि यानिमित्ताने तीन दिवसांत सहा वाघ पाहण्याचे भाग्य लाभले यातच सारे काही आले.
27 तारखेला म्हणजे मंगळवारी सकाळी मुंबईला परतण्यापूर्वी जंगलात आमची आणखी एक फेरी झाली. जाता जाता वाघोबा दर्शन देऊन जातील असे प्रत्येकाला वाटत होते, पण दोन मिनिटांची चुकामूक झाली आणि जणू सगळा खेळ खलास झाला. मागून दोन मिनिटे अंतरावरून येणाऱया गाडीतील पर्यटकांना वाघिणींचे दर्शन झाले होते. आम्ही मात्र त्याला मुकलो होतो, पण या कथेचा उत्कर्षबिंदू पुढेच होता. सारे निराश होऊन बाहेर पडत असताना अचानक एक तरस बाजूने अवतीर्ण झाला आणि सुमारे पाच मिनिटे त्याने आम्हाला त्याच्या विविध भावनांचे दर्शन घडविले. आमच्या मार्गदर्शकाने सांगितले की, एकवेळ वाघाचे दर्शन होईल, पण तरस दिसणार नाही. ते ऐकून पुन्हा एकदा एका दुर्मिळ घटनेचे साक्षीदार झाल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱयावर झळाळून उठले.
रणथंबोर हे पानगळीचे अभयारण्य आहे. त्यातील सत्तर टक्के क्षेत्र धोक वृक्षांनी व्यापलेले आहे. आपल्याकडील अंजन या वृक्षांशी त्यांचे साम्य सांगता येईल.या वृक्षाची पाने गळून गेल्यावर पूर्ण जंगल उघडे बोडके होऊन जाते. त्यामुळे प्राणी दिसण्याची शक्यता कितीतरी पटींनी वाढते. जंगलातील अन्य प्राणी, पक्षी, लहानमोठे वृक्ष, विविध प्रकारचे गवत, विलोभनीय सरोवरे, त्यात निवांतपणे पहुडलेल्या, पण तितक्याच घातक मगरी, पहाड, पठारे, पाणवठे, तेथील प्राणी आणि पक्षी यांच्यातील साहचर्य हे सारे चित्र शब्दांच्या पलीकडले आहे. तरीही ते शब्दांत, चित्रात, फिल्ममध्ये पकडण्यासाठी जगभरातून लेखक, कवी, चित्रकार, पत्रकार, फोटोग्राफर, चित्रपट निर्माते रणथंबोरला येतात आणि त्याच्या प्रेमात पडतात. त्यांच्या आठवणींचा कळसाध्याय असतो तो अर्थातच वाघाच्या डरकाळीचा!




























































