रणवीरने जिवंत केला कपिल देव यांचा प्रसिद्ध ‘नटराज शॉट’!

628

हिंदुस्थानच्या क्रिकेट विश्वात 1983 साली घडलेला इतिहास ’83’ या चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रणवीर सिंग या चित्रपटात कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासाठी तो प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. त्याने शेअर केलेल्या एका फोटोवरून अनेकांनी त्याच्यात कपिल देव दिसत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रणवीरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून कपिल यांच्या रुपात फलंदाजी करत असतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याने कपिल देव यांचा सुप्रसिद्ध नटराज शॉट जिवंत केल्याचं दिसत आहे. गोलंदाजाने फेकलेला चेंडू जोरदारपणे टोलवताना फलंदाजाच्या शरीराची होणाऱ्या नटराजासारख्या स्थितीमुळेच या शॉटला नटराज शॉट असं म्हटलं जातं. कपिल देव यांच्या तुफान फटकेबाजीची एक खासियत असणारा हा नटराज शॉट रणवीरच्या या फोटोमुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे.

कबीर खान दिग्दर्शित 83 या चित्रपटात रणवीरसह अनेक कलाकार झळकणार असून त्यात त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचाही समावेश आहे. कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका दीपिका करणार आहे. या खेरीज 83च्या विश्वचषकातील मूळ क्रिकेट संघातले दोन शिलेदार असलेल्या संदीप पाटील आणि दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दोन मराठी कलाकार पाहायला मिळणार आहेत. चिराग पाटील आणि आदिनाथ कोठारे हे दोघेही अनुक्रमे संदीप पाटील आणि कर्नल वेंगसरकरांची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या सुरू असून पुढील वर्षी एप्रिल महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या