पावसात भिजल्याने यश मिळते, मीही भिजलो- रावसाहेब दानवे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसात भिजल्यावर यश मिळते असा संकेत आहे़ म्हणून मी भाषण न थांबवता तुमच्यासमोर उभा आहे. भविष्यात आम्हालाही यश मिळेल, अशी अपेक्षा आहे, असे वक्तव्य आज केंद्रीय राज्यमंत्री व खासदार रावसाहेब दानवे यांनी केले. त्याला शरद पवार यांच्या विधानसभा निवडणुकीच्या काळातील पावसात भिजण्याचा संदर्भ असल्याने उपस्थितांनी दानवे यांच्या वक्तव्याला भरभरून दाद दिली.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण आज खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते भाषणाला उभे राहिले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी शरद पवारांच्या त्या पावसात भिजत केलेल्या भाषणाचा मिश्किलपणे उल्लेख केला. दानवे म्हणाले, पावसांत भिजल्यावर यश मिळते असा संकेत आहे़ म्हणून मी भाषण न थांबवता तुमच्यासमोर उभा आहे. भविष्यात आम्हालाही यश मिळेल, अशी अपेक्षा आहे.

यानंतर ते म्हणाले, महापुरुषांचे पुतळे उभारण्यामागे त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी हा हेतू असतो. संसदेच्या आवारातदेखील देशातील सगळ्या महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत जेणेकरून या महापुरुषांचा आदर डोळ्यासमोर ठेवून आपण जनतेच्या हिताचे काम करू शकू. संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उभारण्यात आलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळादेखील इथे येणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देईल, यात शंका नाही.

ते म्हणाले, भविष्यात या कृषी उत्पन्न बाजार समितीला अधिक महत्त्व येणार आहे. कारण आपल्याकडे जालन्याला आता ड्रायपोर्ट झाला आहे़ समृद्धी महामार्ग, डीएमआयसी झाली आहे. त्यामुळे केवळ जिल्हा, मराठवाडाच नाही, तर खान्देश, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातून देखील शेतकरी आपला शेतीमाल घेऊन इथे येतील.