‘मेगाभरती’मुळे आम्हीच पक्षाबाहेर ढकलले जाण्याची भीती! – रावसाहेब दानवे

1571
raosaheb-danve

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी आयारामांची गर्दी झाली आहे. भाजपच्या या ‘मेगाभरती’मध्ये अनेक बड्या नेत्यांनी कमळ हाती घेतले. परंतु या मेगाभरतीमुळे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे मात्र थोडे चिंतीत दिसत आहेत. मेगाभरतीमुळे आम्हीच पक्षातून बाहेर ढकलले जाऊ की काय अशी भीती वाटते आहे, असे विधान दानवे यांनी केले आहे. वडगाव मावळ येथे विजयी संकल्प मेळाव्यात बोलतांना त्यांनी हे विधान केले.

मेगाभरतीमुळे आम्हालाच पक्षातून बाहेर ढकलले जातो की काय अशी भीती वाटते आहे. पक्षात माणसे कमी नाहीत उलट दुसऱ्या पक्षातील नेते इकडे येत असताना आम्ही जीव मुठीत घेऊन बसलो होतो, अशी मिश्किल टिपण्णी रावसाहेब दानवे यांनी केली. ते पुढे म्हणाले की, मेगाभरतीमुळे भाजपच्या जुन्या नेत्यांवर त्याचा परिणाम होईल इतके ते सोपे नाही. एक काळ असा होता ज्यावेळी एक कार्यकर्ता तयार करायला 10 वर्षे लागायची, त्यानंतर तो 30 वर्षे पक्षाचे काम करायचा. आता परिस्थिती बदलली असून काही मतदारसंघात पुढील निवडणुकीला कार्यकर्ता कामाला येईल की नाही हे सांगू शकत नाही.

आलेले विचार करूनच
दानवे पुढे म्हणाले की, ज्या कार्तकर्त्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे्, ते काहीतरी विचार करूनच आले असणार. भाजपात गेल्यावर जमेल का? तिथे आपल्याला सांभाळून घेतले जाईल का? अशा प्रश्नांमुळे त्यांना रात्रभर झोपच येत नव्हती. पण त्यांनी हिंमत केली आणि भाजपात दाखल झाले. यावेळी दानवे यांनी जुन्या कार्यकर्त्यांनी नव्यांना सांभाळून घ्यावे असाही सल्ला दिला.

आपली प्रतिक्रिया द्या