
सामना प्रतिनिधी । बीड
बीडच्या न्यायालयातून आरोपी पळाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी टाकून पोलिसांच्या हातावर तुरी देत बेड्यांसह अनिल सुनील पवार या आरोपीने पलायन केलं आहे. या संपूर्ण घटनेमुळे न्यायालय परिसर हादरून गेला आहे.
आरोपी अनिल पवार हा बीड शहरातील शिंदे कॉलनीमध्ये राहणारा रहिवाशी आहे. 2017मध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अनिल पवार हा जेलमध्ये होता. त्याला सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आलं. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्याला हाताला हिसका देऊन त्याने पलायन केलं आहे.
या प्रकरणात आता पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पण आरोपी तिसऱ्या मजल्यावरून पळून जाईपर्यंत सुरक्षा व्यवस्था काय करत होती असा सवाल आता उपस्थित होत आहे.





























































