
शारीरिक चाचणीत नपुंसक निघालेल्या बलात्काराच्या आरोपीला गुजरात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तीन वेळा तपासणी करूनही हा आरोप नपुंसक निघाल्याने जामीन मंजूर करण्यात आला आहे. आरोपी हा फोटोग्राफर असून त्याच्यावर काम मिळवून देण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप आहे.
आरोपीचं नाव प्रशांत धानक असं असून तो एक फ्रीलान्स फोटोग्राफर आहे. ही घटना गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात घडल्याची माहिती मिळत आहे. धानक याच्याविरुद्ध 23 डिसेंबर 2022 रोजी एका 27 वर्षीय तरुणीने काम मिळवून देण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केला. धानकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली.
या प्रकरणाची सुनावणी गुजरात उच्च न्यायालयात झाली. त्यावेळी धानक याच्या वकिलांनी तो नपुंसक असल्याचा युक्तिवाद केला. या युक्तिवादानुसार, बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याच्या तपासणीसाठी वीर्य जमा करण्यासाठी सांगण्यात आलं. मात्र, वीर्य जमा होऊ शकलं नाही.
पोलिसांनी त्याला तीन वेगवेगळ्या दिवशी बोलवून वीर्याचे नमुने गोळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिन्ही वेळा तो उद्दिपित झाला नाही किंवा वीर्यस्खलनही झालं नाही. तसंच आरोपी तरुणी धानक याच्याकडे पैसे मागत होती. ते पैसे न दिल्याने तिने ही खोटी तक्रार नोंदवली, असा युक्तिवाद धानक याच्या वकिलांनी केला. हा युक्तिवाद मान्य करून गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती समीर दवे यांनी धानक याला 10 हजार रुपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर जामीन मंजूर केला.





























































