अल्पवयीन मुलीसोबत बलात्काराचा प्रयत्न, आरोपींकडून पीडितेचे अश्लील फोटो व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rape
प्रातिनिधिक फोटो

राजस्थान येथील धौलपूर येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराचा प्रयत्न झाल्याचं वृत्त आहे. बलात्काराचा प्रयत्न असफल ठरल्यानंतर त्या नराधमांनी पीडितेचे अश्लील फोटो व्हायरल केले आहेत.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, धौलपूर येथे राहणाऱ्या 13 वर्षीय पीडितेला तिच्याच गावातील तीन तरुण फूस लावून आपल्या घरी घेऊन गेले. तिथे जाऊन त्यांनी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. त्यातील एका तरुणाने तिचे काही आक्षेपार्ह फोटोही काढले आणि त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करण्यासाठी धमकी देऊ लागले.

सुदैवाने या मुलीला शोधत असलेली तिची आई तिला हाका मारत तरुणाच्या घराजवळ पोहोचली. तिचा आवाज ऐकून ते तिथून फरार झाले. मात्र, त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी तिचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर पाहिले. तेव्हा त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली. सगळा प्रकार समजताच त्यांनी त्या तिन्ही तरुणांचं घर गाठलं आणि तिथे जाऊन त्यांना जाब विचारला.

यावर त्यातील एका तरुणाच्या कुटुंबीयांनी त्यांनाच धमकी देऊन व्हिडीओही व्हायरल करणार असल्याचं म्हणत धमकी दिली. त्यावर पीडितेच्या वडिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठत या तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे.