
सामना ऑनलाईन । पुणे
पुण्यात एका सहाय्यक पोलीस निरीक्षका विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पुण्यातील्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय राजाराम मदने विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मदने हे हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना पीडित महिलेने तिच्या पती विरोधात तिचा छळ केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यावेळी तिची ओळख मदने याच्याशी झाली होती. काही दिवसांनंतर पती सोबत घटस्फोट झाल्यावर महिलेला आधार देण्याच्या बहाण्याने मदने याने जवळीक साधली. तसेच लग्नाचे अमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. वारंवार लग्नाचा तगादा लावल्याने तिला मारहाण करून तिला व तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस पुढील तपास करत आहेत.




























































