बलात्कार पिडीतेला धमकी देणाऱ्या दोन पोलीस निरीक्षकांची होणार चौकशी

प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

नोकरीचे आमिष दाखवून पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी चौकशीला वेग आला असून, पीडितेवर सेटलमेंट करण्यासाठी दबाव टाकणारे पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे आणि कैलास प्रजापती यांना रविवारी उपायुक्त विनायक ढाकणे यांनी चौकशीसाठी बोलावल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तसेच पोलिसांनी सहा महिन्यांचे मोबाईलचे सीडीआर आणि बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पीडिता ही कुटुंबासह बेपत्ता झाल्याने तपास अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

पोलीस आयुक्तालयातील महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीला नोकरीचे आमिष दाखवून उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सिडकोतील एका बंगल्यात बलात्कार केला होता. गुन्हा दाखल न होता प्रकरण सेटलमेंट करण्यासाठी उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी अधिकाराचा वापर करीत पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे आणि सिडको पोलीस ठाण्याचे कैलास प्रजापती यांना सेटलमेंट करण्यासाठी पाठवले होते. दोन्ही अधिकाऱ्यांनी पीडिता व तसेच तिच्या आईवर प्रकरण दडपण्यासाठी दबाव टाकला होता. तीन ते चार वेळेस या अधिकाऱ्यांनी पीडितेच्या घरी तसेच कार्यालयात बोलावून तक्रार धमकी दिली होती. मात्र, पीडिता तक्रार देण्यासाठी आयुक्तालयात गेली असता तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थातूरमातूर कारणे दाखवत पीडितेला बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर पीडितने आयुक्तांच्या व्हॉटस्ऍपवर तक्रार दिली. तक्रारीत तिने शिवाजी कांबळे आणि कैलास प्रजापती यांनी दबाव टाकल्याचा उल्लेख केल्याने दोघांना सोमवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले असल्याचे उपायुक्त विनायक ढाकणे यांनी सांगितले. तपास अधिकारी विनायक ढाकणे यांनी चौकशीला सुरुवात करीत फेब्रुवारी महिन्यापासून राहुल श्रीरामे व पीडितेच्या मोबाईल सीडीआर मागवले असून, त्यात अनेक वेळा दोघांचे संभाषण आणि व्हॉटस्ऍप मॅसेजेस एकमेकांना पाठवले असल्याचे तपासात समोर येत आहे. तसेच ज्या इमारतीत पीडितेवर अत्याचार झाले त्या इमारतीची सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, तेथील वॉचमनचीही चौकशी केली जाणार आहे. पीडितेचा जबाब अद्याप नोंदवला गेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या