
बलात्कारासारख्या घृणास्पद अपराधाला आळा घालण्यासाठी पाकिस्तान सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आता बलात्कार करणाऱ्या पुरुषाला नपुंसक करण्यात येईल, अशी तरतूद कायद्यात करण्यात येणार आहे.
पाकिस्तानच्या संसदेने एक विधेयक मंजूर केलं आहे. बलात्कार करणाऱ्या आरोपीला रासायनिक पद्धतीने नपुंसक करण्यात येणार आहे. जेणेकरून तो आयुष्यभर कधीच लैंगिक संबंध ठेवू शकणार नाही. या विधेयकाचा उद्देश बलात्कार प्रकरणात लवकरात लवकर निकाल लागावा आणि दोषीला कडक शासन व्हावं हा आहे.
पण, या कायद्याचा जमात ए इस्लामी नावाच्या कट्टरपंथी पक्षाने विरोध केला आहे. हे विधेयक इस्लाम विरोधी आणि शरिया कायद्याविरोधात असल्याचं त्यांन म्हटलं आहे. शरिया कायद्यात नपुंसक करण्याचा काहीही उल्लेख नाही, पण बलात्काऱ्याला सार्वजनिक पद्धतीने फाशी देण्यात यावी असं इस्लाममध्ये म्हटलं आहे. त्यामुळे या पक्षाने कायद्याला विरोध केला आहे.
पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी 8 सप्टेंबर रोजी लाहोर महामार्गाजवळ एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. ही महिला तिच्या दोन मुलांसह लाहोर येथे येत होती. वाटेत तिची गाडी बंद पडली. ती रस्त्याच्या कडेला उभी राहून मदत मागत होती. त्या दरम्यान तिथे आलेल्या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला होता. तिच्या मुलांसमोरच ही भीषण घटना घडली. त्यानंतर पाकिस्तानात कडक कायद्याची मागणी करण्यात आली होती. महिला रस्त्यावर उतरून मागणी करू लागल्या होत्या. त्यानंतर हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे.




























































