विनयभंग, बलात्काराच्या गुन्ह्यात वाढ,अल्पवयीन मुले शारीरिक शोषणाची जास्त बळी

716

मुंबई शहरात विनयभंग आणि बलात्काराचे गुन्हे सर्रास घडत असल्याचे विदारक चित्र आहे. या गुह्यांचे बळी ठरणारे पीडित आरोपींविरोधात तक्रार करण्यासाठी बिनधास्त पुढे येत असल्याने हे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढतच आहे. गंभीर म्हणजे अल्पवयीन मुले शारीरिक शोषणाची सर्वाधिक बळी ठरत असून ओळखीच्यांकडूनच त्यांना लक्ष्य केले जात आहे.

शहरातील गुन्हे, अपघात, त्यांचे प्रमाण, दाखल गुन्हे, झालेल्या कारवाया, कोर्टाकडून झालेली शिक्षा आदीबाबतचा वर्ष 2018 सालातला अहवाल प्रजा फाऊंडेशनच्या वतीने आज जाहीर करण्यात आला. त्या अहवालानुसार शहरात विनयभंग आणि बलात्काराच्या गुह्यांत वाढ होत असल्याचे आकडेवारी सांगते. 2018 सालात या प्रकारचे गुन्हे वाढले असताना त्यातील 69 टक्के गुह्यांत अल्पवयीन मुलांना लक्ष्य केल्याचे भयानक वास्तव आहे. त्यामुळे गेल्या वर्षी ‘पोक्सो’चे गुन्हे पोलीस दफ्तरी दाखल होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे. ओळखीच्या लोकांनीच हे गंभीर कृत्य केल्याचे फाऊंडेशनचे संचालक मिलिंद म्हस्के यांनी सांगितले.

  • बलात्काराचे त्या वर्षभरात 784 गुन्हे दाखल असून त्यात ‘पोक्सो’अंतर्गत दाखल झालेली 540 प्रकरणे आहेत.
  • विनयभंगाचे 2533 गुन्हे दाखल असून त्यात ‘पोक्सो’अंतर्गत दाखल झालेले 352 प्रकरण आहेत.
  • बलात्कार, विनयभंग करणाऱ्या वासनाधीन आरोपींमध्ये आजोबा, वडील, भाऊ यांच्यापैकी 14 भक्षक आहेत. तर कौटुंबिक ओळखीचे 39 जण आहेत.
  • नोकर, ड्रायव्हर आदी ओळखीच्या 136 जणांनी हे गुन्हे केले असून 473 जण हे ओळखी आरोपी ठरले आहेत
  • 54 अज्ञातांकडून हे गुन्हे घडल्याचे आकडेवारी सांगते.

उत्तर-पश्चिम मुंबईत सर्वाधिक गुन्हे

बलात्काराच्या गुह्यांमध्ये उत्तर प्रादेशिक विभाग आघाडीवर आहे, तर विनयभंग गुह्यांची नोंददेखील उत्तर मुंबईतच सर्वाधिक नोंदवली गेली आहे. त्यातही उत्तर-पश्चिम भागात म्हणजेच जोगेश्वरी, गोरेगाव, अंधेरी, मालड या परिसरात बलात्काराचे गुन्हे जास्त घडल्याचे आकडेवारी सांगते.

आपली प्रतिक्रिया द्या