भाजप नेते मधू चव्हाण यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

23724

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, प्रवक्ते आणि मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण पोलीस ठाण्यात बुधवारी हा गुन्हा दाखल झाला. अन्य पक्षांच्या नेत्यांवर आरोप करुन प्रसिद्धी मिळविणाऱ्या प्रवक्ते मधू चव्हाण यांच्या कृत्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

मधू चव्हाण यांनी ‘तुझ्याशी लग्न करेन, तुला पत्नीचा दर्जा देईन’, असे सांगून 2002 पासून 2016 पर्यंत माझी फसवणूक करुन शारिरीक शोषण केले, असा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात ही महिला आवाज उठवण्याचा प्रयत्न करत होती. या महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर चौकशी सुरु झाली होती. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयात गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाविरोधात मधू चव्हाण यांनी अपील दाखल केली. या अपीलावर उच्च न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढताच तो अर्ज मागे घेण्यात आला.

अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी चिपळूण पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, प्रवक्ते आणि मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांच्यावर बलात्कार आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. चिपळूण पोलीस ठाण्यात कलम 376, 354, 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधू चव्हाण यांनी तब्बल 14 वर्ष एका महिलेवर अत्याचार केला. हे प्रकरण बाहेर येताच भाजपचा बुरखा फाटला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या