सुपेमध्ये आणि वडगाव दर्यामध्ये बलात्काराच्या घटना; रक्ताच्या नात्याला काळीमा

1277
प्रातिनिधिक फोटो

सुपे येथे वडीलांनी मुलीवर तर वडगाव दर्या येथे चुलत भावाने बहिणीवर लैंगिक अत्याचार करून रक्ताच्या नात्याला काळीमा फासला. या घटनांमधील दोघीही पिडीता अल्पवयीन आहेत. दोघाही नराधमांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

सुपे येथे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या बापाने शनिवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या मुलीस वाासनेची शिकार करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्याचारानंतर कोठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमीकीही त्याने मुलीला दिली. घाबरलेल्या मुलीने सकाळी आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आईने मुलीला नगरच्या चाईल्ड लाईन टीमकडे नेले. तिथे तिची चौकशी करण्यात आल्यानंतर टिमच्या सदस्यांनी सुपे पोलिस ठाण्यात मुलीच्या बापाविरोधात सोमवारी रात्री तक्रार दाखल केली. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार यापूर्वी 28 सप्टेंबरलाही नराधमाने स्वतःच्या मुलीवर अत्याचार  करण्याचा प्रयत्न केला होता. मुलीची आई व बाप यांच्यात वारंवार भांडणे होत होती. त्याच भांडणाचा फायदा घेत नराधमाने स्वतःच्या मुलीलाच वासनेची शिकार करून मानवतेला काळीमा फासणारे कृत्य  केले.

वडगाव दर्या येथे दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्या सख्या चुलत भावाने घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी घडली. मुलीचे आई वडील जवळच्या गावात नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. शाळेला सुटी असल्याने पिडीत मुलगी घरीच होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ती घरात टीव्ही पाहत असताना शेजारी राहणारा चुलत भाऊ घरात आला. त्याने पिण्यासाठी पाण्याची मागणी केल्यानंतर पिडीता पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेली. त्यावेळी त्याने घराचा दरवाजा लाउन घेत अल्पवयीन बहिणीवर अमानुषपणे लैंगिक अत्याचार केले. सायंकाळी आई वडील घरी आल्यानंतर वडील मारतील या भितीने पिडीतेने कोणासही काही सांगितले नाही. सोमवारी सकाळी वडील दूध देण्यासाठी गावात गेले असता पिडीतेने तिच्या आईला झालेली घटना सांगितली. त्यानंतर तिची आई, वडील व  बहिण यांनी पिडीतेसह पारनेर पोलिस ठाण्यात चुलत भावाविरोधात तक्रार दाखल केली. दोघाही आरोपींविरोधात बलात्कार तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या दोघांनाही अटक करण्यात आल्याचे सुप्याचे पोलीस निरीक्षक राजेंद भोसले, पारनेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या