निसर्गप्रेमी प्रतीक मोरेंना आढळले निलपर्ण जातीचे फुलपाखरू

378

देवरुख येथील निसर्गप्रेमी आणि पर्यावरणाचे अभ्यासक प्रतीक मोरे यांनी आपल्या घरी फुलपाखरांसाठी खास उद्यान तयार केले आहे. या बागेत फेरफटका मारत असताना माडाच्या झाडाशेजारी अचानक एका पानाच्या हालचालीने त्यांचे लक्ष वेधून घेतले. माडाच्या बुंध्याला असं वेगळं पान कसं काय असेल? अशा कुतूहलाने जवळ जाऊन त्यांनी पाहिलं, तर त्यांच्या नजरेस पडलं ते हे सुंदर अचंबित करणार फुलपाखरू. पंख मिटलेले असताना एखाद्या वाळलेल्या पानासारखे ते दिसत होते. पण वारा आल्यानंतर त्याच वाऱ्याबरोबर होणारी हालचाल सुद्धा पानासारखीच होती. इतकी हुबेहूब की एखाद्या भक्षकाला ते पानच वाटावं. याचं शास्त्रीय नांव सह्याद्री ब्लू ऑकलिफ म्हणजेच निलपर्ण!

निंफलिड म्हणजेच ब्रश फुटेड या कुळात मोडणारे हे फुलपाखरू मुंबई पासून दक्षिण दिशेच्या पश्चिम घाटात प्रामुख्याने आढळून येते. याचे पावसाळी आणि उन्हाळी असे दोन प्रकारचे फॉर्म्स दिसून येतात. म्हणजेच जसा आजूबाजूचा परिसर आपलं रुपड बदलतो, तसे हे फुलपाखरू देखील आपली रंगसंगती निसर्गाशी मिळतीजुळती होईल अश्या पद्धतीने बदलते. याला शास्त्रीय भाषेत मिमिक्री असे म्हणतात. मुख्यतः भक्षकांच्या नजरेस पडू नये आणि केमॉफ्लाज मिळवता यावा यासाठी अश्या प्रकारचे बदल सजीव आपल्या शरीरात घडवून आणतात असे मोरे यांनी सामना जवळ बोलतांना सांगितले.

उत्क्रांतीची अशी चालती बोलती उदाहरणे आजूबाजूला पाहत असताना निसर्ग विद्यान किती प्रगत आहे? याची जाणीव पदोपदी होत असते हे नक्की. या फुलपाखराची मादी कारवी जातीच्या झाडांवर अंडी देते आणि म्हणूनच घाट, सह्याद्रीचे डोंगर, कडे, दाट झाडीची जंगलं अश्या ठिकाणी ही वनस्पती पर्यायाने हे फुलपाखरू सुद्धा प्रामुख्याने दिसून येतं. अशी विविधतेने नटलेली आपली सह्याद्रीची जंगलं किती वैशिष्टय पूर्ण आहेत त्याचा हा अजुन एक ढळढळीत पुरावा असल्याचे प्रतीक मोरे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या