निसर्गमित्रांनी दिले दुर्मीळ अजगर आणि मांडुळाला जीवदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उरणमध्ये निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दुर्मीळ असणाऱ्या मांडूळ व अजगराला मंगळवारी जीवदान दिले आहे. या दुर्मीळ सापांना या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वनाधिकाऱ्यांच्या सहकार्याने जंगलात सोडून दिले.

उरण तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले असल्याने वन्यजीवांचे वास्तव्य नेहमी आढळून येते. कलंबूसरे येथील मराठी शाळेच्या पटांगणात आलेल्या भल्यामोठ्या अजगराला सर्पमित्र महेश भोईर यांनी पकडून त्याला जीवदान दिले.तर खारपाडा विभागात जिते गावाशेजारी कैलास पाटील यांच्या घराशेजारी आढळून आल्यावर या संस्थेचे सदस्य जाऊन त्यांनी मांडूळ जातीच्या सापाची सुटका केली. अजगर सुमारे दहा फूट लांबीचा तर मांडूळ चार ते साडेचार फूट लांबीचा होता.

वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था उपाध्यक्ष आनंद मढवी, उरण वनक्षेत्र अधिकारी शशांक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकारी डी डी पाटील, वनक्षेत्ररक्षक सूरदास धांडे, सी एस बोरसे दिलीप मढवी यांनी चिरनेर जवळील जंगलात जाऊन या दुर्मीळ सापांना सोडून दिले.