बीड महामार्गावरील चिंचपूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, पाथर्डी

तालुक्यातील चिंचपूर फाटा येथील वृक्ष तोड प्रकरणात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गैरप्रकार केला असून या प्रकरणाची चौकशी करत वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज पाथर्डी बीड महामार्गावरील चिंचपूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या आश्वासना नंतर दोन तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी ते चिंचपूर फाटा या महामार्गाचे काम चालू असून हे काम करणाऱ्या ठेकेदाराने मागील पंधरवड्यात नियमाची पायमल्ली करत चिंचपूर फाटा येथील शेतकरी आदिनाथ खेडकर यांची तीन झाडे तोडली. रस्त्यापासून जास्त अंतरावर असतानाही ही झाडे तोडल्याने खेडकर यांनी त्या वेळी वनविभागाकडे तक्रार केली. तक्रार केल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांचा टेम्पो, झाडे तोडण्याचे दोन कटर व तीन मजुरांना ताब्यात घेतले. मात्र केवळ पाच हजार रूपये दंड करून त्यांना सोडण्यात आल्याने संतप्त झालेल्या चिंचपूर इजदे येथील नागरिकांनी या प्रकरणाची चौकशी करावी या मागणीसाठी आज चिंचपूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.

या आंदोलनात आदिनाथ खेडकर यांच्या सह भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, गोकुळ दौन्ड, दत्ता खेडकर, बबन खेडकर, रणजित बेळगे, अर्जुन धायतड्क, विठ्ठल मिसाळ, कुंडलीक नागरगोजे, बबलू खेडकर, विनायक खेडकर यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते. या वेळी आंदोलकांनी रस्त्याच्या कामात अडथळा ठरत नसलेली व रस्त्याच्या हद्दीत नसलेली झाडे ठेकेदाराने कशी तोडली? रस्त्याच्या कडेला असलेली बारा मीटरपर्यंतची झाडे तोडण्याचा नियम असताना साडे तेरा मीटरवर असलेली झाडे कशी तोडली? पाथर्डी तालुक्यातील झाडे तोडताना बीड जिल्ह्यातील वन विभागाने दिलेल्या परवान्यांचा कसा वापर केला? तीन झाडे तोडून जर फक्त पाच हजार रुपयांचा दंड पाथर्डी तालुक्यातील वनविभागाचे अधिकारी करत असेल तर मग आम्ही सुद्धा झाडे तोडण्याचे काम करुत आम्हाला सुद्धा आर्थिक दंड करुन सोडून देणार काय, असे प्रश्न उपस्थित केला गेला. तसेच या प्रकरणात आर्थिक घोटाळा झाला असून हा घोटाळा करणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली. या आंदोलनाला तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी हे सामोरे गेले व त्यांनी येत्या दोन दिवसात या विषयावर विनविभागाचे अधिकारी, ठेकेदार व आंदोलकांची बैठक घालून देऊ, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.