
सामना प्रतिनिधी । मुंबई
पवईतील आयआयटी मेन गेटसमोर एका दुचाकीस्वाराला धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फरार वाहनचालकाला अखेर मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-10ने शोधून काढले. अपघात करणारा तो टेम्पो चालक आहे. टेम्पोवर असलेल्या शिधावाटप कार्यालयाच्या बॅनरवरून पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला.
14 सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास संजय मयेकर (43) हे दुचाकीवरून जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक देऊन पळ काढला होता. या धडकेत मयेकर यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर युनिट-10चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मुदीराज, खरात, अंमलदार पाटील, राजगुरू, धारगळकर, राठोड, गवेकर, चवरे, हडकर, ठोंबरे या पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळी सीसीटीव्ही नसल्याने आरोपीच्या वाहनाचा शोध घेणे कठीण बनले होते. पोलिसांनी त्या मार्गावरील अन्य सीसीटीव्ही तपासल्यानंतर एका फुटेजमध्ये काही वाहने संशयास्पदरीत्या जाताना दिसली. त्यात एक टेम्पो होता, पण टेम्पोचा रजिस्टर नंबर दिसत नव्हता, केवळ शिधावाटप कार्यालयाचा बॅनर अस्पष्ट दिसत होता. त्या आधारे पोलिसांनी वेगवेगळय़ा ठिकाणी शोधाशोध केली. अखेर घाटकोपर येथील हायवे ऑन व्हील ट्रान्सपोर्ट प्रा. लि.कंपनीच्या मालकाकडे चौकशी केल्यावर त्यांच्या गोवंडी येथील पार्ंकग परिसरात फुटेजमधला टेम्पो मिळून आला. त्यानंतर टेम्पोचालक शंकर यादव (32) याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने गुह्याची कबुली दिली.






















































