रत्नागिरीत शुकशुकाट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी रत्नागिरीकर एकवटले आहेत. बुधवारपासून सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. लॉकडाऊनमुळे रत्नागिरीत शुकशुकाट पसरला असून रस्ते ओस पडले आहेत. नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले असून केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू आहेत.

रत्नागिरी जिह्यात कोरोनाबाधितांची संख्या 661 वर जाऊन पोहोचली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यात 17 रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये जिल्हा विशेष कारागृहातील 8 कैदी आणि 2 पोलिसांना कोरोना झाला. पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्या व्यतिरिक्त कारवांची वाडी, परकार हॉस्पिटल, रत्नागिरी शहर, दापोलीतील हर्णे, खेड येथील खोपी, वेरळ, आष्टी, घरडा कॉलनी, चिपळूणातील खेर्डी, कापडेवाडी, संगमेश्वरमधील ब्राह्मणवाडी आणि मंडणगड येथील रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत 26 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 450 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या 169 रुग्ण उपचार घेत आहेत. रत्नागिरात सुरू झालेला लॉकडाऊन 8 दिवस सुरू राहणार आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5पर्यंत उघडी असल्याने संध्याकाळी रस्ते ओस पडत आहेत. अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कुडाळातही कडकडीत बंद!

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने 2 ते 8 जुलै या कालावधीत लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर गुरुवारी पहिल्याच दिवशी कुडाळ तालुक्यासह जिल्हाभरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. दरम्यान, कुडाळ शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. मास्क न लावणाऱ्यांवर कुडाळ नगर पंचायत प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. पोलीस प्रशासनाकडूनही ठिकठिकाणी वाहन तपासणी मोहीम राबवून अनावश्यक वाहने घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई केली.