
गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांकरीता मार्गदर्शक सुचना जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना कोरोना चाचणीची आवश्यकता नाही. मात्र ज्यांचे दोन डोस पूर्ण झालेले नाहीत त्यांना 72 तास आधीच्या आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागेल. किंवा त्यांची जिल्ह्यात प्रवेश करताना कोरोना चाचणी करण्यात येईल. चाचणीत ज्या व्यक्ती कोरोनाबाधित सापडतील त्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली.
गणेशोत्सवासाठी एसटीच्या गाड्या 100 टक्के क्षमतेने प्रवास करणार आहेत. त्यामुळे प्रवासादरम्यान कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. आणि त्याची जबाबदारी एसटीच्या चालक आणि वाहकावर टाकण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच गणेशोत्सव काळात महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महामार्गावर आरोग्य यंत्रणेसह रुग्णवाहिका व इतर यंत्रसामुग्री सज्ज ठेवण्यात येणार आहे.
श्री गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणूकांना बंदी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणूका काढू नयेत असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. गणेशोत्सव काळात आरती, भजन, कीर्तन, जाखडी अशा कार्यक्रमांना गर्दी करू नये. हे कार्यक्रम कौटुंबिक स्तरावर व्हावेत. शासनाने नेमून दिलेल्या मानकाप्रमाणे गणेशमूर्ती असावी. सजावट आणि आरास करताना प्लॅस्टीक आणि थर्माकोलचा वापर टाळून नैसर्गिक वस्तूंपासून आकर्षक आरास करावी. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीचा शक्यतो वापर करु नये. अशा मुर्तीचे विसर्जन घरगुती स्वरुपात करावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी देताना श्री गणेशाचा प्रसाद देणे टाळावे. सुका मेवा, फळे यांचा प्रसाद द्यावा. मिठाईतील भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदुषण टाळावे. तसेच गणेशमुर्तीचे विसर्जन घराच्या आवारात करावे. गणेशविसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करुन त्यामध्ये विसर्जन करावे. नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीकडून गणेश मुर्ती संकलन वाहनाची व्यवस्था करण्यात यावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक गणपती दीड दिवसांचा असावा
जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करु नयेत असे आवाहन केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव केल्यास गणपती दीड दिवसाचा असावा अशी सूचना त्यांनी केली आहे. अशा ठिकाणी कमीत कमी लोकांची उपस्थिती ठेवणे आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.



























































