रत्नागिरीतील तरुणाची कमाल, उताराचा उपयोग करत केली वीजनिर्मिती!

1071

काही तरी नवीन करूया अशी संशोधन वृत्ती असलेली माणसे नेहमीच धडपडत असतात. रत्नागिरी तालुक्यातील जाकिमिऱ्या गावातील विनायक बंडबे या तरूणाने उताराचा उपयोग करून कोणतेही इंधन न वापरता वीजनिर्मिती केली आहे. त्याच्या पथदर्शी प्रकल्पातून त्याने ५ हजार वॅट वीज निर्मित केली असून ही एक ग्रीन एनर्जी आहे. मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती झाल्यास त्यातून रोजगार निर्मिती होईल, अशी आशा विनायक बंडबे याला आहे.

सर्वसामान्य कुटूंबातील विनायक बंडबे याच्यात एक संशोधक दडला आहे. यापूर्वी त्याने खाडीच्या पाण्यावर टर्बाईन वापरुन वीज निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प केला होता. त्यापूर्वी विनायकने थर्माकोलची होडी बनवून मिऱ्या ते काळबादेवी असा प्रवास केला होता. त्याच्या प्रवासाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्येही झाली आहे. विनायक बंडबेने त्याच्या घरातील आवारात वीजनिर्मितीचा प्रकल्प केला आहे. इकडून तिकडून सामान गोळा करून त्याने संपूर्ण यंत्रणा उभी केली. एक अल्टरनेटर, दोन रोलर लावून एक उतार निर्माण केला. रोलर फिरले की उंचीवर ठेवलेले वजन उताराच्या दिशेने खाली येते त्याचवेळी उर्जा निर्माण होते. याचे प्रात्यक्षिकही त्याने पत्रकारांसमोर करून दाखवले.

विनायक बंडबे यांनी पत्रकारांना सांगितले की, हा शंभर टक्के ग्रीन उर्जा देणारा प्रकल्प आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर प्रकल्प असून भविष्यात लोकसहभागातून मला १५ मेगावॅटचा प्रकल्प राबवायचा आहे. त्यासाठी १० गुंठे जमीन आवश्यक आहे. प्रकल्पासाठी ५ ते ७ कोटी रुपयांची गरज आहे. यातंत्रज्ञानावर वीजनिर्मिती केल्यास प्रति मेगावॅट ४० ते ५० लाख खर्च येतो म्हणून अन्य वीजनिर्मितीपेक्षा हा प्रकल्प स्वस्त आहे, असे मत त्याने मांडले. १५ मेगावॅटचा प्रकल्प उभा केल्यास २०० जणांना त्याप्रकल्पातून रोजगारनिर्मिती होईल, अशी आशा त्याने व्यक्त केली. त्याला गॉडवीन नरोणा यांनी मदत केली.

आपली प्रतिक्रिया द्या