कशेडी घाटात खासगी आराम बस दरीत कोसळली, 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाट चढताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने चिंतामण ट्रॅव्हल्स या कंपनीची खासगी आराम बस सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. पोलादपूर तालुक्यातील भोगाव नजीक पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात एका सात वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अन्य 26 प्रवाशांना वाचविण्यात मदतकार्य करणाऱ्या पथकाला यश आले. एक प्रवाशी बसमध्येच अडकून पडला होता त्याला दोन तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार चिंतामणी ट्रॅव्हल्स या कंपनीची खासगी आराम बस मुंबई सायन येथून 27 प्रवाशांना घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे जायला निघाली होती. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास कशेडी घाट चढत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण वहान सुटले आणि प्रवाशांनी भरलेली ती बस काही कळायच्या आत सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा बसमधील बहुतांशी प्रवाशी हे साखर झोपेत होते. खोल दरीतून प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरु झाली.

प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकून घाटात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरीत काळोख असल्याने दरीतील प्रवाशांना बाहेर काढण्यात अनेक अडचणी येत होत्या. मात्र पोलीस आणि मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहचलेल्या ग्रामस्थांनी मोठ्या हिमतीने दरीत अडकलेल्या अनेक प्रवाशांना बाहेर काढले.

अपघाताची खबर मिळताच जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थान च्या रुग्णवाहिकेची चालक मुकुंद मोरे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना पोलादपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. पोलीस या प्रकरणी अधिक तपासत करत आहेत.