
महिला व बाल विकास विभाग अंतर्गत अंगणवाडी बालक आहार पुरवठा करणाऱया खडपोली येथील गोदामात निकृष्ट धान्य साठा आढळल्याने खडपोली ग्रामस्थांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी संताप व्यक्त केला. ठेकेदाराने रातोरात येथील निकृष्ट धान्यसाठा इतरत्र हलविण्याचा प्रयत्न केला असता तो ग्रामस्थांनी हाणून पाडला. ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर गोदाम सील करण्यात आले. याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे आमदार शेखर निकम व जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी सांगितले.
तालुक्यातील खडपोली औद्योगिक वसाहतीत हे गोदाम असून त्यामध्ये सुमारे 25 टन धान्य होते. यातील बहुतांशी धान्य खराब झाले असल्याने स्थानिक ग्रामस्थ व शिवसेनेच्या महिला संघटक रेश्मा पवार, सरपंच रोशनी पवार, सामाजिक कार्यकर्ते मुराद अडरेकर, व पंचायत समिती सभापती धनश्री शिंदे यांनी हा प्रकार उघडकीस आणला. त्यानंतही याबाबत प्रशासकीय स्तरावर गंभीरपणे दखल घेतला गेली नाही.
उलट शुक्रवारी रात्रीच्या वेळी सबंधीत ठेकेदाराने 12 गाड्या मागवून धान्य रातोरात स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, शहरप्रमुख उमेश सकपाळ व अन्य पदाधिकाऱ्यांनी त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. तसेच आलेल्या वाहनांच्या टायरमधील हवा सोडून त्यांना तेथेच थांबवून ठेवण्यात आले. जिल्हापरिषद अध्यक्ष रोहन बने, आमदार शेखर निकम यांनी या गोदामाला भेट देऊन पाहणी केली. रोहन बने यांनी वितरित झालेले धान्य परत मागवण्याचा सूचना महिला बाल विकासच्या अधिकाऱ्यांना केल्या. तसेच या धान्याचा पंचनामा करून तुर्तास गोदाम सील करण्याच्या सूचनाही सबंधिताना दिल्या.





























































