Ratnagiri News – कोकणातील हापूस संशोधनासाठी इस्त्रायलच्या तंत्रज्ञाचा उपयोग होणार! हिंदुस्थानातल्या 25 संशोधकांचा विशेष दौरा

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या हिंदुस्थान-इस्राइल कृती आराखड्याअंतर्गत हिंदुस्थानामध्ये विविध पिकांमध्ये गुणवत्ता केंद्रांची स्थापना झालेली आहे. या गुणवत्ता केंद्रातील तसेच या गुणवत्ता केंद्रांसाठी राज्यस्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना इस्राइल येथे विविध फळ पिकांच्या बागांमध्ये वापरण्यात येणारे आधुनिक तंत्रज्ञान कळावे, यासाठी विविध राज्यांमधून 25 जणांचे इस्राइल येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातून दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या आंबा गुणवत्ता केंद्राचे प्रकल्प प्रमुख डॉ. महेश मनमोहन कुळकर्णी, छत्रपती संभाजीनगर येथून केशर आंबा गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील व नागपूर येथील संत्रा गुणवत्ता केंद्राचे डॉ. रतीराम खोब्रागडे यांची निवड करण्यात आली होती.

इस्राइल येथील प्रशिक्षण कार्यक्रमात तेथील शेती उद्योग, बागायती पीक संत्रावर्गिय फळे, आंबा, डाळिंब, केळी, अवाकडो यांची व्यवस्थापन पद्धती व त्यातील नाविन्यपूर्ण प्रयोग तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीतील वापर व त्यासाठी स्थापन झालेले नवीन स्टार्टप या विषयांवर बौद्धिक माहिती व त्यातील काही बागायती केंद्रांना भेट, असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. इस्राइल मधील आंब्याचे क्षेत्र हे सुमारे 2700 हेक्टर एवढे असून उत्पादकता 50 टन प्रती हेक्टर एवढी आहे. इस्राइल येथील आंब्याला पोषक वातावरण, हेक्टर मध्ये सहा बाय तीन मीटरवर लागवड व त्यामुळे झाडांची हेक्टरी वाढलेली संख्या, बारा फुटापर्यंत झाडाची मर्यादित उंची तसेच झाडाच्या वाढीसाठी पाण्याचा व खतांचा वापर व झाडाच्या प्रोटेक्शन साठी नेटचा वापर, फळांना बॅगिंग अशा आधुनिक गोष्टींमुळे ही उत्पादकता मिळत असल्याचे तेथील शेतकरी यांनी सांगितले.

इस्रायल इथे आंब्याच्या किट, केंट, माया कस्तुरी, शेली, डेव्हिड, ऑमर या जातींची लागवड असून साधारण 60 टक्के एक्सपोर्ट मार्केट व 40% डोमेस्टिक मार्केट आहे. युरोपमध्ये मुरोक्को, केनिया, स्पिन इथून येणाऱ्या आंब्यामुळे इस्राईलच्या आंबा मार्केटवर परिणाम होताना आढळत आहे. इस्राइल येथे आधुनिक पद्धतीने नर्सरी व्यवस्थापन केले जाते त्यामध्ये सर्व पिकांसाठी मातीविरहित माध्यमांचा वापर केला जातो. कलमांसाठी लागणाऱ्या काड्या या प्रोटेक्टेड कंडिशन्समध्ये वाढवलेल्या झाडातूनच काढून दिल्या जातात व खाजगी नर्सरी धारकांच्या नर्सरीचे इन्स्पेक्शन होऊन दोन वर्षांची वाढलेली झाडे लागवडीसाठी उपलब्ध करून दिली जातात. शेती हा उद्योग समजला जात असल्यामुळे कुठल्याही गोष्टीला सबसिडी मिळत नाही.

बी हिरो या सेन्सर बेस पोलिनेशन तंत्रज्ञानाची माहिती तसेच एनओएफ हे कमी खर्चात फळ जास्त कालावधीसाठी कशी टिकवता येतील त्याबद्दलची माहिती तसेच पल्सर या वातावरणातील तापमान कमी अधिक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती, ज्या ठिकाणी कमी उत्तराची जागा आहे, अशा ठिकाणी पाण्याच्या प्रेशरवरच एन्-ड्रिप या पद्धतीने झाडांना पाणी देण्याबद्दलच्या तंत्रज्ञानाची माहिती लेक्चरच्या आधारे करून देण्यात आली.

इस्राइल येथील वातावरण, जमीन, पीक पद्धती, जाती, मार्केट या सगळ्या गोष्टी हिंदुस्तानापेक्षा खूपच भिन्न आहेत. परंतु पुढील कालावधीत तेथील तंत्रज्ञानाचा वापर आपल्या भागामध्ये कसा करता येईल याबाबत संशोधन उपक्रम आंबा गुणवत्ता केंद्राच्या माध्यमातून त्या कंपन्यांनी सहयोग दाखवल्यास हिंदुस्थानात घेण्यात येईल, असा विश्वास दापोली येथील डॉ.बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाच्या आंबा गुणवत्ता केंद्राचे प्रकल्प प्रमुख डॉ. महेश कुळकर्णी यांनी व्यक्त केला.