दापोलीत 29 गोवंश ताब्यात, बकरी ईदच्या दिवशी कारवाई

तालुक्यातील विसापूर येथील समशेरअली नगर मोहल्ला येथे कत्तलीसाठी आणलेली 29 गोवंशीय जनावरे (10 गायी, 15 बैल व 4 वासरे) दापोली पोलिसांनी ताब्यात घेतली. याप्रकरणी तीन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ऐन बकरी ईद सणाच्या दिवशीच हा प्रकार उघडकीस आल्याने तणाव पसरला होता. खबरदारी म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

विसापूर समशेरअली नगर येथील संशयित हनीफ शेखअली मालवणकर, हासीम हनीफ मालवणकर व फारुख शेखअली मालवणकर यांच्या घराच्या परिसरात तेथील जंगल भागात तीन जिवंत गोवंश व गोवंशाचे मांस आढळून आले. तसेच मांस कापण्यासाठी वापरण्यात येणारे लाकडी साहित्य सापडले. गोठ्याची पाहणी केली असता त्यात कत्तल करण्यासाठी आणलेले गोवंश दाटीवाटीने, वेदना होतील अशा अवस्थेत दोरीने बांधून कोंडून ठेवलेल्या अवस्थेत होते, असे पोलिसांनी सांगितले.