
2015 पासून सर्व शेतकरी आणि मच्छिमार यांची सर्व कर्ज माफ करा अशी मागणी आज रत्नागिरी जिल्हा जिल्हा शेतकरी, आंबा-काजू उत्पादक आणि मच्छिमार संघटनांनी केली. अवकाळी पाऊस आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि वादळांमुळे मच्छिमारांचे नुकसान झाले असल्याचे मत जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडण्यात आले. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या लढ्याला पाठिंबा देताना आज आंबा बागायतदार आणि मच्छिमार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
निवेदनात त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या आहेत. पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही पीक विम्याची रक्कम विमा कंपनीला न देता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. फळबागांना ई-पीक पाहणी रद्द करावी, वन्य प्राण्यापासून पीकांचे नुकसान होते त्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रकाश साळवी, दीपक उपळेकर, बी.के. पालकर, श्रीकृष्ण कबीर, अनिल शेलार, संजय कदम, अशोक भाटकर, अमृत पोकडे, हरिश्चंद्र गोरीवले उपस्थित होते.
 
             
		





































 
     
    





















