Ratnagiri News – देवघळी बीचचा विकास रखडला; ग्रामस्थांचा ‘जल उपोषण’चा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सनसेटसाठी प्रसिद्ध असलेल्या कशेळी गावातील ‘देवघळी बीच’वर गेल्या पाच-सहा वर्षांत पर्यटकांची लक्षणीय वाढ झाली असली, तरी मूलभूत सुविधांचा अभाव कायम असल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. निधी मंजूर होऊन वर्कऑर्डर निघाल्यानंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यामुळे नाराजीचा सूर तीव्र झाला आहे.

आवळचीवाडी परिसरातील या समुद्रकिनाऱ्याच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पतन विभागामार्फत २०२४ मध्येच कामाची वर्कऑर्डर काढण्यात आली होती. मात्र, वर्षभराहून अधिक काळ लोटल्यानंतरही प्रत्यक्षात कोणतीही हालचाल दिसत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता येथे संरक्षक कठडे, सुरक्षाविषयक सूचना फलक, सार्वजनिक स्वच्छतागृहे, पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच पक्क्या रस्त्यांची आवश्यकता आहे. या सुविधा अद्याप उपलब्ध नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे.

स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत संबंधित अधिकाऱ्यांशी वेळोवेळी संपर्क साधून पाठपुरावा करण्यात आला. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष किनाऱ्याची पाहणीही केली; मात्र त्यानंतरही कामाला गती मिळालेली नाही, असा आरोप माजी सरपंच दीपक हळदणकर यांनी केला. संबंधित उपअभियंत्यांकडून केवळ आश्वासने दिली जात असल्याचीही त्यांची खंत आहे. कशेळी ग्रामपंचायतीने पतन विभाग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे लेखी पाठपुरावा केला आहे. तरीही दाद न मिळाल्याने ग्रामस्थांनी आता आक्रमक भूमिका घेतली असून, ठराविक मुदतीत काम सुरू न झाल्यास समुद्रात पाण्यात बसून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

विशेष म्हणजे, २०१९ मध्ये मिरीटाईम बोर्डामार्फत सुमारे एक कोटी रुपये खर्चून या किनाऱ्याचा काही प्रमाणात विकास करण्यात आला होता. अलिकडच्या काळात रस्त्याचे डांबरीकरण, स्वच्छतागृह उभारणी व परिसराचे सुशोभीकरण आदी कामांचे प्रस्ताव मांडण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने पर्यटनावर विपरीत परिणाम होत असल्याची भावना ग्रामस्थांत व्यक्त होत आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कामास गती द्यावी आणि पर्यटकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे