Ratnagiri News – खुराड्यात कोंबड्या फस्त करायला गेला अन् अडकला, बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे मुंबई-गोवा महामार्गानजिक असलेल्या एका व्यक्तीच्या कोंबड्यांच्या खुराड्यात कोंबड्या फस्त करण्यासाठी आलेला बिबट्या जेरबंद झाला आङे. रविवारी (27 जुलै 2025) सकाळी साडेसहच्या दरम्यान ही घटना घडली असून खुराड्यातील कोंबड्यांवर बिबट्याने ताव मारला आहे.

सकाळी साडेसहाच्या सुमारास हा बिबट्या मधुकर कुंभार यांच्या कोंबड्यांच्या खुराड्यात घुसला व यातील काही कोंबड्या फस्त केल्या. याची चाहुल अवधूत याला लागताच त्याने धाव घेतली व खुराड्यात गेला असता आत बिबट्या असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने मागचं पाऊल घेत प्रसंगावधान राखत खुराड्याचा दरवाजा बंद केला व बिबट्या आत कैद झाला. यावेळी बिबट्याने खुराड्यातील कोंबड्या फस्त केल्या आहेत.

तात्काळ याची माहिती वनविभाग व संगमेश्वर पोलीस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण हे त्याचे सहकारी कॉन्स्टेबल संदेश जाधव, सोमनाथ खाडे, गिरप्पा लोखंडे, सिद्धेश आंबरे, अरुण वानरे, रमेश गावित यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी ग्रामस्थांनी बिबट्याला पहाण्यासाठी गर्दी केली होती. वनविभागाचे वनपाल न्हानू गावडे हे आपले सहकारी वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडुकर, सुप्रिया काळे, किरण पाचर्णे, शर्वरी कदम यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले.