
मुंबई गोवा महामार्गावर आरवलीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या मिनी बसने एका कारला धडक दिल्याने दोन महिलांसह दोन मुली जखमी झाल्या. मिनी बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर चालक आणि त्याचा सहकारी जंगलात पळून गेले. रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुहागर येथील मिनी बस रत्नागिरी येथे प्रवासी सोडण्यासाठी गेली होती. प्रवासी सोडून या बस गुहागर येथे परतत होती. बसचा चालक रवी अरुण झाल्टे हा मिनी बस घेऊन भरधाव वेगाने चालला होता. यादरम्यान आरवली येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या महामारवरील अवघड वळणावर चालकाचा बसवरील नियंत्रण सुटले. बस दुभाजकाला आदळून पेट्रोल पंपजवळ असलेल्या पंक्चर काढणाऱ्या दुकानात घुसली.
याच दरम्यान पंक्चर काढण्यासाठी मारुती व्हॅगनआर कार थांबली होती. मिनी बसने या कारला भीषण धडक दिली. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच कारमधील आबोली कल्पेश घडशी, रुद्रा रुपेश घडशी, ऋग्वेद कल्पेश घडशी, कियारा रुपेश घडशी हे जखमी झाले. हे सर्वजण मुंबईहून गणपती सणासाठी आंबव पोंक्षे या आपल्या मूळगावी आले होते. अंत्रवली येथील नातेवाईकाकडे गेले असताना कार पंक्चर झाल्याने ते पंक्चर काढण्यासाठी या ठिकाणी थांबले होते. अपघात होताच चालक रवी अरुण झाल्टे व त्याचा सहकारी जंगलात पळून गेले.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच माखजनचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक विवेक साळवी, त्यांचे सहकारी पोलीस सोमनाथ खाडे घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला.