
संगमेश्वर तालुक्यातील सप्तेश्वर रोडवरील आयडिया कंपनीच्या मोबाईल टॉवरवरून महागडे साहित्य चोरी करण्याचा प्रयत्न संगमेश्वर पोलिसांनी वेळीच हाणून पाडत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या त्वरित व धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास, संगमेश्वर हिल परिसरातील आयडिया कंपनीच्या मोबाईल टॉवरवर काही संशयित इसम केबल व बीटीएस (BTS) साहित्य चोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. टॉवरवर केअर टेकर म्हणून कार्यरत असलेले संदीप रामचंद्र पवार यांनी संशयास्पद हालचाली लक्षात येताच तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच चोरट्यांची पळापळ सुरू झाली. तपासादरम्यान आरोपी एकमेकांच्या संगनमताने कंपनीचे किमती साहित्य चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात फुरकान अब्दुल हक (वय २५ ) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यासोबत असलेला एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, या टोळीतील सय्यद इंजमाम सय्यद हसन तसेच नाव व पत्ता अद्याप अज्ञात असलेला एक आरोपी हे दोघे घटनास्थळावरून फरार झाले आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके कसोशीने तपास करत आहेत. या घटनेप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६२(३)(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक आर. एस. गावित यांच्या हाती सोपवण्यात आला असून, प्रभारी पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगाने सुरू आहे.
मोबाईल टॉवर सारख्या अत्यंत संवेदनशील आणि सार्वजनिक संपर्कासाठी महत्त्वाच्या ठिकाणी होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या दळणवळणावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अशा घटनांना आळा घालण्यासाठी संगमेश्वर पोलिसांनी दाखवलेली तत्परता व शिस्तबद्ध कारवाई नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. या कामगिरीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून, सर्व स्तरांतून संगमेश्वर पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.


























































