Ratnagiri News – संगमेश्वरच्या पंचक्रोशीत अवकाळी पावसाचा तडाखा; आंबा-काजू बागायतदार संकटात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणचा राजा मानला जाणारा आंबा आणि काजू या नगदी पिकांवर यंदा निसर्गाने वक्रदृष्टी फिरवली आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवळे, चाफवली, मेघी या पंचक्रोशीसह परिसरात आज (26 मार्च 2026) दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. ऐन आंबा हंगाम सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असताना आलेल्या या पावसामुळे बागायतदार आणि व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले असून, शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे.

यावर्षी सुरुवातीला आंबा आणि काजूला मोहर चांगल्या प्रमाणात आला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत वाढलेल्या अति उष्णतेमुळे मोहर करपून काळा पडला होता. त्यामुळे आधीच उत्पादनात घट झाली असताना, आता मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आलेल्या पावसाने उरले-सुरले उत्पन्नही हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

बागायतदारांनी बागेची साफसफाई, महागडी खते, कीटकनाशकांच्या फवारण्या आणि राखणदारांवर मोठा खर्च केला आहे. मात्र, पावसाच्या या जोरदार सरींमुळे फळांवर डाग पडणे, बुरशी येणे आणि फळगळ होणे अशा समस्या निर्माण होणार आहेत. सुमारे एक तास चाललेल्या या पावसाने आंबा-काजू पिकाचे अतोनात नुकसान केले असून, “केलेल्या खर्चाचा ताळेबंद कसा बसवायचा?” असा प्रश्न आता बागायतदारांसमोर उभा ठाकला आहे.

संगमेश्वर परिसरातील शिवने गावात पावसासोबत गाराही पडल्या. शेतात भाजावणीच्या कामात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांची अचानक आलेल्या पावसामुळे मोठी धावपळ उडाली. आज सर्वत्र रामनवमीचा उत्साह असतानाच दुपारी ३ च्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाने सुरुवात केली. यामुळे मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांचीही तारांबळ उडाली. एकूणच, वाढते तापमान आणि आता झालेला अवकाळी पाऊस ही निसर्गाची अवकृपाच असल्याची भावना कोकणातील शेतकरी व्यक्त करत आहे.