
“मंजिल उन्ही को मिलती है, जिनके सपनों मे जान होती है”, या प्रेरणादाई वाक्याला अनुसरून चिपळूणच्या जलकन्येने एका श्वासात 120 फूट खोल समुद्रात झेप घेतली आहे. पायलट होऊन आकाशात भरारी घेणाऱ्या समृद्धी देवळेकरने आता समुद्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. फिलिफाइन्स येथे फ्री डायव्हिंग क्रीडा प्रकारात तिने हिंदुस्थानसह कोकणाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. हिंदुस्थानची फ्री डायव्हिंग प्रशिक्षक म्हणून तीने आपल्या नावाचा आता शिक्कामोर्तब केला आहे.
फ्री डायव्हिंग ही जलक्रीडा आहे. यामध्ये ऑक्सीजन सिलेंडरचा वापर न करता फक्त एका श्वासात खोल समुद्रात प्रवेश केला जातो. जलकन्या समृद्धी देवळेकर हिने एका दमात 120 फूट खोल समुद्रात प्रवेश करत एक उच्चांक गाठला आहे. सुरूवातीला पायलट होऊन आकाशात भरारी घेणाऱ्या समृद्धीने आता समुद्रावर राज्य केलं आहे. फिलिपाइन्स येथे आंतरराष्ट्रीय डायव्हिंग प्रशिक्षण घेऊन ती आता कुडाळ येथील डायव्हर्स ऑफ विंगोरीय यांच्या सोबत प्रशिक्षण देण्यासाठी दाखल झाली आहे. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर समृद्धीने हे यश मिळवले आहे. ती महाराष्ट्रातील एकमेव फ्री डायव्हिंग प्रशिक्षक आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक राजू देवळेकर आणि स्वाती देवळेकर यांची सुकन्या समृद्धी हिने कोकणचं नाव जगाच्या नकाशावर कोरलं आहे.





























































