
संगमेश्वर तालुक्यातील शास्त्रीपूल ते गणेशकृपा हॉटेलपर्यंत एकेरी वाहतूक सुरू असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मुंबईकडे जाताना गणेश कृपा हॉटेल ते शास्त्री पूल दरम्यान एकेरी वाहतुकीचा रस्ता असल्याने, मानसकोंड पासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. मानसकोंड व काही वेळा स्वाद हॉटेल पासून शास्त्रीपूलापर्यंत पोहचण्यासाठी 2.30 ते 3 तास लागत आहेत. त्यामुळे वाहनक चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबई, पुण्यात वास्तव्याला असणाऱ्या कोकणवासियांना शहरात पोहोचण्याची घाई असते. त्यामुळे प्रत्येकजण पुढे पुढे जाण्याच्या नादात वाहतुककोंडीची परिस्थिती निर्माण होत आहे. अगोदरच रस्त्याला असंख्य खड्डे व एकेरी वाहतूक यामुळे वाहन चालक पुरते हैराण झाले आहेत. गेले 15 वर्षे कोकणवासीय मुंबई व पुणेकरांना हा त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी रस्ता पूर्ण होईल अशी आश्वासने व घोषणा केल्या जातात. याला अपवाद कसा असेल? यावर्षीही जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावर्षीचा गणेशोत्सव खड्डेमय व अपुऱ्या कामाचा शेवटचं वर्ष असेल. पुढच्या वर्षीच्या अर्थात सप्टेंबर 2026 मध्ये होणाऱ्या गणेशोत्सवाला दृतगती महामार्ग पूर्ण झालेला असेल, असे आश्वासन दिले होते. शिवाय चिपळूण येथील रखडलेल्या उड्डाणपूलाचे काम देखील पुढच्या पावसापूर्वी पूर्ण असेल, असे पालकमंत्री यांनी पत्रकार परिषदेत सांगिलतले होते. आता हे तरी आश्वासन खरे ठरणार का? हे भविष्यात पाहावे लागेल.
संगमेश्वर येथील सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे ही वाहतूक कोंडी होण्यास कारण ठरत आहे. या पुलाचे काम कुर्म गतीने सुरू असल्याने या ठिकाणी वाहतूक व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे. येथील पोलिसांची देखील दमछाक झालेली पाहायला मिळत आहेत. संगमेश्वर येथील पुलावरचे काम खरतर अत्यंत जलद गतीने कालमर्यादेत होण्याची गरज होती. पण याकडे ना कंपनी गांभीर्याने घेते आहे ना प्रशासन. 2011 मध्ये या महामार्गाच्या कामाला सुरवात झाली, परंतु अद्याप 14 वर्षे होऊन गेली तरी हा प्रकल्प पुर्ण झालेला नाही.
देशातील राज्यातील अनेक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रकल्प 2011 नंतर सुरू झाले व प्रत्यक्षात लोकार्पण देखील झाले. पूर्वांचल एक्स्प्रेस वे, समृद्धी महामार्ग, बुंदेलखंड एक्स्प्रेस वे, पूर्व पेरिफरल एक्स्प्रेस वे असे अनेक महामार्ग तयार झाले. पण मुंबई-गोवा महामार्गाला लागलेलं ग्रहण अद्याप सुटलेले नसल्याने अख्या कोकणातील रहिवाशांना या महामार्गाच्या उपभोगापेक्षा त्रासातच 14 वर्षे घालवावी लागली. रस्त्याच्या कामामुळे झालेले अपघात, धुळीचा त्रास, खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी असे अनेक त्रास सहन करावे लागले आहेत.