
घरकुलाचा हप्ता मिळवण्यासाटी एका दिव्यांग व्यक्तीला संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या मग्रुरीचा सामना करावा लागत आहे. घरकुलाचा शेवटचा हप्ता पोस्टातील खात्यात आला आहे. मात्र संबंधित खात्यातील कर्मचाऱ्यांनी प्रत्येक वेळी त्यांना उडवा उडवीची उत्तरे देऊन पैसे देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तीची फरफट करत करून संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना काय मिळते? अशा प्रश्न सर्वजण विचारत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कळंबस्ते साटलेवाडीतील विलास वसंत लोकरे पायाने दिव्यांग आहेत. त्यामुळे त्यांना चालताना बराच त्रास होतो. त्यांना शासनाच्या घरकुल योजनेतून घरकुल प्राप्त झाले आहे. पहिले दोन हप्ते सुरळीतपणे प्राप्त झाले. मात्र, शेवटचा हप्ता पोस्टातील खात्यात येऊन सुद्धा त्यांना अद्याप मिळालेला नाही. आतापर्यंत पाच वेळा विलास लोकरे हे फणसवणे, कसबा, संगमेश्वर येथील पोस्टात चालता येत नसून सुद्धा प्रत्येक फेरीसाठी 500 रुपये खर्च करून रिक्षाने गेले. प्रत्येक वेळी त्यांना संबंधित खात्यातील लोकांनी खाते लिंक नाही, इतकी कॅश नाही, लाडक्या बहिणीच्या वाटपासाठी पैसे हवेत, नेटच नाही, अशी उडवा उडवीची उत्तर देऊन पैसे देण्याचे टाळाटाळ केली आहे. यात स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून वारंवार सरकारी कार्यालये, पोस्ट आणि बँका यात सर्वसामान्य लोकांना होणारा त्रास कमी करावा अशी मागणी करण्यात येत आहे.