
वादळासह पडलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात साडेतीनशे घरांसह गोठे, शासकीय इमारतींचे मिळून सुमारे पन्नास लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. वादळामुळेविजेचे खांब, वाहिन्या तुटून गेल्यामुळे महावितरणला ८० लाखाचा फटका बसला आहे.
वादळामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये महावितरणचे सुमारे ८० लाख रुपयांचे नुकसान झाले असून, शेकडो वीज खांब जमीनदोस्त झाले आहेत. तर विविध तालुक्यांत अनेक घरांची पडझड होऊन लाखो रुपयांची हानी झाली आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यामुळे महावितरणच्या पायाभूत सुविधांची मोठी पडझड झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, उच्चदाब वाहिनीचे १०८ आणि लघुदाब वाहिनीचे २३५ असे एकूण ३४३ वीज खांब कोसळले आहेत. अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वीजवाहिन्या तुटून पुरवठा खंडित झाला आहे.
राजापूर तालुक्यात सर्वाधिक ७३ घरे आणि गोठ्यांचे १७ लाख १९ हजाराचे नुकसान झाले. रत्नागिरी तालुक्यातील २४ घरांसह १ अंगणवाडी आणि २ शासकीय इमारतींचे मिळून सुमारे १५ लाख, मंडणगड तालुक्यातील ११७ घरांचे ५ लाखांचे, संगमेश्वर तालुक्यातील ११ घरांना फटका बसला असून ५ लाख २८ हजारांचे नुकसान झाले आहे. चिपळुणात ३८ घरांचे २ लाख ३४ हजारांचे अंशतः नुकसान झाले.





























































