
जातीनिहाय जनगणना करावी या प्रमुख मागणीसाठी उद्या 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी समाजाचा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्हाभरातील ओबीसी बांधव सहभागी होणार आहेत.
उद्या होणाऱ्या मोर्चाविषयी माहिती देताना ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे चंद्रकांत बावकर यांनी सांगितले की, उद्या 26 नोव्हेंबरला मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा सुरू होणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून ओबीसी समाजातील बांधव या मोर्चात सहभागी होईल. 1931 नंतर जातीनिहाय जनगणना झालेली नाही. त्यामुळे ओबीसी समाजाची लोकसंख्या, शिक्षण, बेरोजगारी याविषयीची माहिती मिळत नाही. ओबीसी समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय स्थिती काय आहे हे कळत नाही. शासकीय सेवेत सर्व श्रेणींमध्ये ओबीसी समाजाचे एकूण प्रतिनिधीत्व किती आहे. याबाबतची माहिती निश्चित झाल्याशिवाय ओबीसी समाजाच्या विकासाचे धोरण सरकारला ठरवता येणार नाही. म्हणून ओबीसी समाजाची जनगणना होणे आवश्यक आहे. याकरीता हा मोर्चा काढण्यात येणार आहे. उद्या संविधान दिनी राज्यात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी समाजाचा मोर्चा निघणार आहे.






























































