रत्नागिरीत पोलिसाला धक्काबुक्की, संचारबंदी मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल

788

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेली संचारबंदी मोडणाऱ्या, लोकसेवकांना दमदाटी करून करणाऱ्यांवर रत्नागिरीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुहागर तालुक्यात संचारबंदीत लग्न करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी शहरात राजिवडा येथे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्यानंतर त्यापरिसरात सर्व्हेसाठी गेलेल्या आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांना माजी नगरसेवक बिजली खान याने अटकाव करत दमदाटी केली होती. त्याच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा प्रकार रत्नागिरी तालुक्यात नवा फणसोप येथे घडला. जमावबंदी असताना तिचे उल्लंघन करून सात-आठ जण उर्दु शाळेच्या समोरील रस्त्यावर एकत्र आले होते. त्यावेळी पोलीस पाटील शादाब मुकादम याला अटकाव करत जमावाने दमदाटी केली. इम्रान सोलकर याने शादाब मुकादमच्या दंडाला धरून फरफटत नेत शासकीय कामापासून परावृत्त केले. त्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जमाव करणाऱ्या मौसीन होडेकर, याकुब होडेकर, हमीद पावसकर, मकबूल फणसोपकर, गफूर पटेल, फैरोज होडेकर, इकलाक होडेकर यांच्यासह 10-15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून इम्रान सोलकर याला अटक करण्यात आली आहे. गुहागर तालुक्यातील कोसबीवाडी येथे लग्नासाठी 90 ते 110 लोकांना आमंत्रित करून जमावबंदीचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत वेले, प्रकाश हारेकर, सिध्दोधन मोहिते, संजय जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या